सातारा पुढारी वृत्तसेवा: ज्यांनी नकारात्मक प्रश्न केले तेच आज इमारतीसाठी 10 कोटी रुपये मिळाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. पाच वर्षांतील एक तरी मोठे काम दाखवा असे कालपर्यंत केकाटणारे आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल असे भाष्य करत आहेत. साविआने केलेल्या कामांचा धसका घेऊन दुतोंडी भूमिका त्यांना घ्यावी लागत आहे, असा टोला खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांना लगावला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दुतोंडी आणि स्वार्थी असणार्या बाजारबुणग्यांची कुजकट दुर्गंधीयुक्त घाण यापूर्वीच सातारकरांनी पालिकेतून बाहेर काढून फेकून दिली आहे. त्यावेळी नाकदेखील कापले गेले तरीसुद्धा भोके आहेत असे म्हणत वर तोंड करून ते फिरत आहेत.
नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर मी स्वत: ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वैशिष्ट्यूपर्ण योजनेतून निधी देण्याची ग्वाही मिळवली.
दोन महिन्यांपूर्वी 10 कोटींचा निधी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर झाला आहे. आता हे फुकटचे फौजदार 10 कोटींबद्दल संबंधित मंत्र्यांचे उशिरा अभिनंदन करत आहेत म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी यांची अवस्था आहे. सहकारी संस्थांंनंतर आता दुसरे आयते कुरण म्हणून ते निव्वळ स्वार्थासाठी नगरपरिषदेकडे पाहत आहेत, असा आरोपही खा. उदयनराजे यांनी केला.
ना. अजित पवार यांनी चांगल्या कामाकडे बघून सातारकरांनाच नव्हे तर सर्वांनाच भरभरुन दिले आहे. लोकहिताच्या कामासाठी त्यांनी वेळोवेळी मंजुर्या व निधी दिला आहे. त्यांचे लोकदायित्व ते पार पाडत आहेत. परंतु यांचे तोंड बघितल्यावर ना. अजित पवार यांनी पैसे दिले असा डांगोरा हे स्वतः पिटत आहेत.
तुम्ही तुमचा मुखडा दाखवल्याने ना.अजित पवार यांनी निधी दिला हे जर खरे असेल तर फक्त एखाद-दुसर्या कामासाठीच तुम्ही तुमचे सुमुख किंवा कुमुख किंवा जे काय असेल ते का दाखवले? सातारकरांसाठी अधिक वेळा त्यांचे मुख त्यांनी दाखवून ना. अजित दादांकडून अधिक कामे, निधी का मंजूर करुन घेतला नाही? असे प्रश्न सातारकर विचारत असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. सातारा विकास आघाडी सातारकरांची घरची आघाडी आहे.
नवीन प्रशासकीय इमारत, नगरपरिषदेच्या पॉवर हाऊस येथे वीज निर्मिती, शहापूर पाणी पुरवठा योजना सोलर विजेवर चालवणे (प्रस्तावित), कचरा कुंडी मुक्त शहर, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या, घनकचरा व्यवस्थापनांतर्गंत सोनगाव येथे सेग्रीगेशन, भुयारी गटर योजना, घरकुल योजना, आयुर्वेदिक गार्डन सह विविध बगीचांचा विकास, कास धरण उंची वाढवणे, पाणीपुरवठा साठवण टाक्या, व्यापारी संकुले, गोडोली प्राथमिक आरोग्य केंद्राचा विकास, कस्तुरबा रूग्णालयाचा विकास अशी अनेक कामे साविआने मार्गी लावली आहे.
हद्दवाढ झाल्यानंतर आयत्या रेघोट्या मारणार्या स्वार्थांध बाजीरावांना सातारा पालिकेच्या पायर्यासुध्दा दिसू नयेत, अशी भूमिका सातारकरांनी घेतली असल्याचे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.
तुमचा सगळीकडचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणार आहे. त्याच्या कागदपत्राची सुरळी चांगलीच ठासणार आहे. श्रेयासाठी धडपडणारी नविआ म्हणजे नकारात्मकता आहे. नगरविकास आघाडी एका नगराची म्हणजेच पडतळीत जागा घेवून, त्यातील प्लॉट विकणार्या विशिष्ट कंपूची आहे.
नविआचे मुळातच असलेले नगण्य अस्तित्व दाखवण्यासाठी यांची ही फुकटची फौजदारी आणि बाजीरावकी चालू आहे, अशी टीकाही खा. उदयनराजेंनी केली आहे.