सातारा  
सातारा

सातारा : साखर आयुक्‍तांच्या बैठकीत निर्णय : किसनवीरच्या सभासदांना दिलासा

सोनाली जाधव

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल 5 लाख टन ऊस तोडणीविना उभा आहे. यावर दै. 'पुढारी'ने आवाज उठवल्याने या प्रश्‍नाची आता तड लागली आहे. सोमवारी साखर आयुक्‍तालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील इतर कारखानदारांनी आपण 30 ते 35 हजार टन ऊस गाळप करू, असा शब्द दिला. आयुक्‍तांनीही याबाबत लवकरात लवकर हंगाम संपवून नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे किसनवीरच्या ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणावरून विधानसभेत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात रणकंदन झाले. मात्र, त्यावर किसनवीरच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडून नेण्याबाबत काहीच झाले नाही. त्यामुळे याविरोधात दै. 'पुढारी'ने आवाज उठवला. 'पुढारी'ने आवाज उठवल्याने किसनवीर कार्यक्षेत्रातील सभासदांनी व्यापक जनआंदोलनाची तयारी केली. किसनवीरच्या कार्यक्षेत्रातील सर्वच तालुक्यांमधून उस तोडणीसाठी दबाव वाढू लागला. दै. 'पुढारी'ने किसनवीरच्या तोडणीअभावी उभ्या असलेल्या उसतोडीचा सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी साखर आयुक्‍तांना किसनवीरचा ऊस कोणत्याही परिस्थितीत तुटला पाहिजे, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्ह्यातील आठ कारखान्याच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यामध्ये शेतकर्‍यांच्या बाजूने सकारात्मक चर्चा झाली आहे.

सहकारमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनीही तात्काळ हालचाली केल्या. प्रारंभी त्यांनी किसनवीर कार्यक्षेत्रातील किती ऊस शिल्‍लक आहे व जिल्ह्यातील कोणते कारखाने ऊस तोडून नेत आहेत, याचा आढावा घेतला. यानंतर सोमवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील अजिंक्यतारा, जरंडेश्‍वर, शरयू, स्वराज, न्यू फलटण शुगर्स, दत्त इंंडिया, जवाहर या साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील जे कारखाने कार्यरत आहेत त्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जे कारखाने किसनवीरचा ऊस नेण्यास उत्सुक आहे. ते कारखाने किती ऊस नेणार याची चाचपणी आयुक्‍त गायकवाड यांनी केली. यावर प्रत्येक कारखान्याने साधारणत: 35 हजार टन ऊस गाळप करण्याचे कारखान्याच्या लोकप्रतिनिधींनी सांगितले.

जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे इथेनॉल प्रोजेक्ट आहेत. उसापासून तयार होणारी साखर थेट इथेनॉलकडे वळवली जात आहे. त्यामुळे नक्‍की उतारा किती आला यासाठी ईएसआय प्रमाणपत्र देण्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. यावेळी कोणत्या कारखान्याच्या किती टोळ्या किसनवीरच्या कार्यक्षेत्रात आहेत व शिल्‍लक ऊस तोडण्यासाठी किती टोळ्यांची गरज आहे, याची माहितीही आयुक्‍तांना देण्यात आली.

किसनवीरच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर 8 कारखाने नेणार आहे. प्रत्येक कारखाना साधारणत: 35 हजार टन ऊस नेणार आहे. आज झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. काही दिवसांतच याबाबतचे नियोजन करून लवकरात लवकर उसाचे गाळप केले जाणार आहे.
– शेखर गायकवाड साखर आयुक्‍त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT