कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : रहिमतपूर येथील बेगरवस्तीत विद्युत पोलवर दुरुस्तीचे काम सुरू असताना शॉक लागल्याने कंत्राटी कामगार प्रणित हणमंत गुरव (वय 27) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली असून रहिमतपूर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता युवराज वाघ यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रणित गुरव हा पाच ते सहा वर्षांपासून महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास रहिमतपूर येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानेे बेगरवस्ती येथून महावितरण कार्यालयात याबाबतचा फोन आला. यावेळी ड्युटीवर असणार्या महिला कर्मचार्याने प्रणितला विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचे सांगितले. येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रणितसह आणखी एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डीपीमधील फ्यूज काढून प्रणित विद्युत पोलवर चढला. याचवेळी प्रणितला अचानक शॉक लागल्याने तो खाली फेकला गेला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, प्रणित हा शेतकरी कुटूंबातील होता. एकच महिन्यापूर्वी त्याच्या मोठया भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. आता प्रणितचाही मृत्यू झाल्याने गुरव कुटूंबावर संकटाचे आभाळ कोसळले आहे. घरामध्ये प्रणित हा एकटा कमावता होता. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे त्याच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.