सातारा

सातारा : शैक्षणिक प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी जाहीर

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या काहीच दिवसांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकालही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी लागणार्‍या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. यादीनुसार आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव विद्यार्थ्यांनी करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.

दहावी व बारावीनंतर सुरू होणार्‍या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबवली जाते. जून महिन्यातच दहावी बारावीचे निकालही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागातील नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशही लवकरच सुरू होणार आहेत. यामध्ये एसएससी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी, औषध निर्माण शास्त्र, एच. एम. सी. टी. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका, तसेच अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एम टेक, आर्किटेक्ट, एमबीए, एमसीए हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरू होणार आहेत.

ऐन प्रवेश प्रक्रियेवेळी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना विद्यार्थ्यांची धांदल उडते. बर्‍याचदा आवश्यक दाखले न मिळाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रवेशास आवश्यक सर्व कागदपत्रांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार असून त्यांची गैरसोयही दूर होणार आहे. दरम्यान, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सज्ज व्हावे, अधिक माहिती संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र

तंत्रशिक्षण संचलनालयाने जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीत जात/जमात प्रमाणपत्र, जात-जमात वैधता प्रमाणपत्र दि. 31 मार्च 2023 पर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आर्थिक द़ृष्ट्या दुर्बल घटक दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र सैन्यदलातील प्रवर्गाचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याकांसाठी प्रवर्गाचे प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्न बँक खाते आदि दाखल्यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT