सातारा

सातारा : शेकडो मशालींनी उजळला शिवतीर्थ

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  येथील श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने आयोजित केलेल्या मशाल महोत्सवाने रविवारी सायंकाळी शेकडो मशालींनी शिवतीर्थ उजळून निघाला. तसेच महाआरतीने राजधानी सातार्‍यात वीरश्री संचारली होती. मशाल महोत्सव पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सातार्‍यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवतीर्थ पोवईनाका येथे रविवारी सायंकाळी 350 मशाल महोत्सव व महाआरतीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आ. भरत गोगावले होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, समितीचे कार्याध्यक्ष व दै. 'पुढारी'चे वृत्त संपादक हरीष पाटणे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, अध्यक्ष राजू गोरे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, रविंद्र झुटींग, रविंद्र माने, पत्रकार दिपक शिंदे, राजेश सोळसकर, प्रशांत जगताप, युवा उद्योजक विक्रम पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर मशाल महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव ,जय जिजाऊ जय शिवराय, भारत माता की जय, हिंदु धर्म की जय अशा विविध घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला. शिवतीर्थावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवतीर्थावर चारही बाजूंनी 350 मशाली प्रज्वलित केल्याने परिसर उजळून निघाला होता.मशाली प्रज्वलित केल्यानंतर तुतारीचा निनाद व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या नयनरम्य सोहळ्यामुळे जणू शिवकालच अवतरला असल्याचा भास झाला होता. मशाल महोत्सवाचा नयमरम्य सोहळा पाहण्यासाठी शहर व परिसरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी गेली होती. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मशाल महोत्सवानंतर आ. भरत गोगावले यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर शिवप्रेरणा मंत्र झाला. शिवराज्याभिषेक सोहळयाच्या महाआरतीने राजधानी सातार्‍यात वीरश्री संचारली होती.

एकदा तरी रायगडावर शिवप्रेमींनी भेट द्यावी : आ. भरत गोगावले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो. दि.2 जून रोजी 350 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा रायगडावर होणार असून त्या पार्श्वभुमीवर श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सप्ताहाचे आयोजन केले आहे. छत्रपतींच्या इतिहासात दोन गाद्यांना महत्व आहे. त्यात सातारची गादी महत्वाची मानली जाते. हा 350 शिवराज्याभिषेक दिन सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. भाविक राज्यासह देशातील तिर्थस्थळांना भेटी देत असतात त्याप्रमाणे एकदा तरी किल्ले रायगडाला शिवप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन आ. भरत गोगावले यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT