Maharashtra Politics 
सातारा

सातारा : शिवप्रतापदिनी प्रतापगडावर येणार मुख्यमंत्री; शिवपुतळ्यास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  किल्ले प्रतापगड येथे दि. 30 नोव्हेंबर रोजी शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या शिवप्रतापदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडावर भव्य असा जरीकाठी भगवा झेंडा फडकवण्यात येणार आहे. शिवपुतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी याबाबतचा आढावा सोमवारी घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. स्वराज्य विस्ताराचा पाया ज्या गडाच्या पायथ्याशी घातला, इतिहासातील सर्वात मोठा प्रताप घडवला त्या किल्ले प्रतापगडावर अफजलखान वधाची तिथी दरवर्षी शिवप्रतापदिन म्हणून साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी ही तिथी बुधवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी आली आहे. शिवप्रतापदिन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दूरद़ृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, ध्वजस्तंभास शोभेल असा भव्य जरीकाठी भगवा झेंडा ठेवावा. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्युत रोषणाई करावी, लेझर शो, मशाल महोत्सव व आतषबाजीचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्युत जनित्र ठेवावे. तालुकास्तरीय आधिकार्‍यांनी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांना कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे, जास्तीत जास्त नागरिक या उत्सवात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. कार्यक्रमस्थळी जाणार्‍या प्रमुख रस्त्यांची कामे त्वरित करावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार्‍या या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना ना. देसाई यांनी दिल्या.

सुरूवातीस सकाळी भवानी मातेची पूजा अभिषेक व आरती त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम. शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपुतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप असणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती अचूक तयारी करावी, अशा सूचना पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT