सातारा

सातारा : शिरवळमध्ये आपत्कालीन यंत्रणेची वानवा

दिनेश चोरगे

नायगाव; पंकज नेवसे : खंडाळा तालुक्यातील शिरवळ हा वर्दळीचा परिसर आहे. मात्र, या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची वानवा असल्याने कंपन्या किंवा बाहेरील व्यक्तींवर अवलंबून रहावे लागत आहे. अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा, ट्रेकर्स अशी कोणतीच यंत्रणा खंडाळा तालुक्यात नसल्याने आपत्कालीन परिस्थिती प्रशासन हतबल दिसते. अशावेळी स्थानिक पातळीवर उपाययोजना होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

खंडाळा तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. त्यात शिरवळ शहर तालुक्याचा केंद्रबिंदू आहे. शिरवळाचा वाढता विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. तरीही एखादी दुर्घटना घडली की दुसर्‍यांवर अवलंबून रहावे लागत असल्याचे वास्तव आहे.

या भागात कधी कुठे आग लागली तर खासगी कंपनीचा बंब बोलवावा लागतो. स्वत:ची अशी यंत्रणा नसल्याने प्रसंगी वाई, भुईंज किंवा फलटण येथून बंबाला बोलवावे लागते. त्यामुळे जो 'गोल्डन अवर' असतो तो हातातून निघून जातो. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे खंडाळा तालुक्यात स्वतंत्र अशी अग्निशामक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती आजही दुसर्‍यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ खंडाळा तालुक्यावर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी शिरवळ येथील जवळच असणार्‍या नदीपात्रात पणन सहसंचालकांचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या शोधासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग,दोन कालव्यांचे विस्तारीकरण, विस्तीर्ण नीरा नदीचे पात्र, वीर धरणाचा फुगवटा अशी परिस्थिती असतानाही तालुक्यात ट्रेकर्स नाहीत. शिरवळ पुलावरून आत्महत्या वाढल्या असून यासाठी शोध कार्यासाठी स्थानिक पातळीवर अत्याधुनिक ट्रेनिंगसहित प्रशिक्षित ट्रेकर्स अथवा रेस्क्यु टीम उभारणे गरजेचे आहे.

शिरवळ शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. याच महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत यावेळी गंभीर अपघातासाठी तत्काळ सेवा देण्यासाठी फक्त एक खाजगी दवाखाना आहे. अत्याधुनिक सेवेसहित असा सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे. गंभीर व्यक्तिला नेण्यासाठी साधी रूग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने या सर्व गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. यामध्ये महामार्ग प्राधिकरण तर डोळे मिटून गप्प आहे. त्यांच्याकडूनही आपत्कालीन परिस्थिती हताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे आहे.

तपासावेळी सीसीटीव्हीचा आधार

पोलिसांना तपासासाठी खासगी हॉटेलचालकांच्या सीसीटीव्हीवर अवलंबून रहावे लागत आहे. यासाठी सारोळा पुलावर सीसीटीव्हीची उभारणी महामार्ग प्रशासन, राजगड पोलिस किंवा शिरवळ पोलिसांच्यावतीने होवू शकत नाही का? असा सवालही उपस्थित होत आहेे. पुलावरून होणार्‍या आत्महत्या रोखण्यासाठी जाळी लावण्याची मागणी होत होती. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्याने या घटना कमी झालेल्या नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT