कण्हेर; बाळू मोरे : कण्हेर परिसरासह सातारा तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पिके काढणी बरोबर मळणीची लगबग सुरू आहे. काही शिवारात ही कामे पूर्णत्वाला गेली आहेत तर काही ठिकाणी अद्याप ही कामे सुरूच आहेत. भर उन्हात शेतकरी काबाडकष्ट करून अन्नधान्याची तजबीज करून ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. कुठे कडब्याच्या पेंढ्या बांधण्यात येत आहेत तर कुठे मळणी करून धान्याची रास लावली जात आहे. त्यामुळे शिवारा-शिवारात सकाळी व सायंकाळच्या सुमारास ही कष्टाची कामे सुरूच आहेत.
ठिकठिकाणच्या शिवारात गहू काढणीस आला आहे. त्यासाठी शेतकर्याला मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे पैरेवारी करून गहू काढला जात आहे. या कामात कुटुंबातील सर्वच सदस्य सहभागी होत असून एकमेकाला मदत केली जात आहे. गव्हाच्या पेंड्या तयार करून मशीनद्वारे मळणी केली जात आहे. मळणीला पोत्यामागे 400 रुपये मोजावे लागत आहेत.
उसाचा गाळप हंगाम आता अखेरीला गेला आहे. काही ठिकाणी ऊसतोडणीची धांदल अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी कष्टकरी मजूर चिमुकल्यांना खोपटात ठेवून घाम गाळत आहेत. ऊसतोड टोळ्या आता थोड्याच उरल्या आहेत. काहींनी परतीचा रस्ता धरला आहे. त्यामुळे उसाची शिवारेही मोकळी होत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी ज्वारीची पोती घरी नेऊन सुमारे तीन ते चार दिवस ज्वारी धान्य वाळवत आहेत. शेतकरी कुटुंब वाळलेली ज्वारी त्यातील कूस व पालापाचोळा बाजूला होण्यासाठी वार्याला देऊन ज्वारी वाढवली जात आहे. ग्रामीण भागात ज्वारीला महत्त्व असल्याने ती ज्वारी वर्षभर पुरेल इतकी जपून कणगीमध्ये साठवणूक करून ठेवली जात आहे.
सध्या उष्णतेच्या लाटेचा फटका दिवसभर उन्हात काम करणार्या शेतकरी वर्गाला अधिक बसत आहे. त्यामुळे सकाळ व संध्याकाळच्या वेळी शेतातील कामांना प्राधान्य दिले जात आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असताना अशा कडक उन्हात शेतकरी राजा शेतात कामे उरकत आहे. मध्यंतरी वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर अवकाळीच्या संकटाचे ढग जमा होवून पावसानेही तडाखा दिला. त्यामुळे काही ठिकाणी नुकसानही झाले. ज्या ठिकाणी ज्वारी भुईसपाट झाली तिथे काढणीच्यावेळी शेतकर्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी पिकाबरोबरच ऊस, गहू, हरबरा ही पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. मजुरांच्या साहाय्याने गहू, हरभरा काढला जात आहे. उन्हाचा चटका सोसत गहू, हरभरा पीक काढले जात आहे. या कामामध्ये वेळ काढून शेतकरी व मजूरवर्ग मध्यभोजन एकत्रित करताना दिसत आहेत.