सातारा

सातारा : ‘शासन आपल्या दारी’चे 2.74 लाख लाभार्थी; जितेंद्र डुडी यांची माहिती

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा आणि त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा. यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'शासन आपल्या दारी' या योजना जिल्ह्यात तळागाळात राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 74 हजार 348 नागरिकांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी उत्तम कामगिरी केली, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी काढले.

सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल ते 30 ऑगस्ट या कालावधीत शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात येत आहे. 13 मे रोजी दौलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमार्फत नागरिकांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येत आहे. गावपातळीवर या अभियानाची माहिती देऊन नागरिकांकडून लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर आयोजित मेळाव्याच्या ठिकाणी विविध दालनांद्वारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याच ठिकाणी लाभांचे वाटपही करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या पुढाकाराबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. वेळ आणि खर्चात बचत होत असून हा उपक्रम पुढेही सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.

कराड तालुक्यात सर्वाधिक लाभ

जिल्ह्यात 2 लाख 74 हजार 348 जणांना लाभांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सातारा तालुका 38 हजार 913, जावली 15
हजार 23, कोरेगाव 19 हजार 521, कराड तालुक्यात 48 हजार 62, फलटण 32 हजार 748, वाई 18 हजार 608, महाबळेश्वर 7
हजार 718, खंडाळा 19 हजार 169, माण 18 हजार 760, खटाव 26 हजार 718, पाटण 29 हजार 108 लाभांचे वाटप करण्यात
आल्याचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी सांगितले.

या विभागांची कामगिरी

जिल्ह्यात तालुकास्तरावर या योजनेची अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात महसूल, महिला व बाल विकास, शिक्षण, आरोग्य, कृषि, नगर विकास, समाज कल्याण, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अशा विविध विभागांमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' या योजनेला जिल्हावासियांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात 2 लाख 74 हजार 348 जणांना लाभाचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयात जाण्याचा वेळ या उपक्रमामुळे वाचला आहे.
-जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी, सातारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT