सातारा

सातारा : व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया मंदावली

दिनेश चोरगे

सातारा; मीना शिंदे : कोरोना पश्चात शिक्षण क्षेत्रातील कामकाज नियमित झाले असतानाही यावर्षी व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश परीक्षा, निकाल व प्रत्यक्ष प्रवेश या सर्वच प्रक्रियांमध्ये दिरंगाई झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिना आला तरी व्यावसायिक शिक्षणातील काही प्रवेश प्रक्रिया अपूर्णच राहिल्या आहेत.

सीईटी सेलच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. सीईटीचे प्रवेश संथगतीने सुरू असल्याने शैक्षणिक संस्था चालक तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अभियांत्रिकी, कृषी, कृषि अभियांत्रिकी, उद्यानविद्या, औषध निर्माणशास्त्र, एमबीए, लॉ यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित राबवली जाते. सीईटी परीक्षा, निकाल तसेच व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या नियंत्रणात आहे. सर्व नियोजन सीईटी सेलकडूनच केले जाते. राज्यभरातील व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये, त्यामध्ये मंजूर प्रवेश क्षमता यांचा ताळमेळ घालून गुणवत्ता यादीनुसार प्रवेशक्रम ठरवला जातो. विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार रिक्त जागेवर प्रवेश दिले जातात. मागील दोन वर्षे शिक्षण क्षेत्रातील कामकाजाचे नियोजन कोलमडले होते. बोर्ड परीक्षाही रद्द झाल्या होत्या. कोरोना पश्चात शिक्षण क्षेत्रातील कामकाजात नियमितता आली आहे. बोर्ड परीक्षा व निकाल वेळेत लागले आहेत. असे असतानाही सीईटीवर आधारित सर्वच प्रवेश रखडले आहेत.

सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेचे योग्य नियोजन केले गेले नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सीईटी सेलच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गेले सात महिने घरात बसून आहेत. अर्धे वर्ष वाया गेल्याने शैक्षणिक संस्थाचालक, विद्यार्थी व पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान…

व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होवून कॉलेज सुरू होण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे. जून अखेेरीस शैक्षणिक वर्ष संपणार आहे. अवघ्या सहा ते सात महिन्यांसाठी संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे. त्यातच ही महाविद्यालये अवघ्या दोन अडीच महिन्यांतच एक सत्र संपवणार असल्याने या कालावधीत शैक्षणिक अभ्यासक्रमाचा धावता आढावाच घेतला जाणार असल्याने शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांकडून ते कितपत ग्रहण केले जाणार? असा सवाल उपस्थित होत असून, या सर्व परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

SCROLL FOR NEXT