सातारा

सातारा : वडगाव हवेली येथे दोन कोटींच्या पाईप जळून खाक

दिनेश चोरगे

रेठरे बुद्रूक;  पुढारी वृत्तसेवा :  वडगाव हवेली (ता. कराड) गावासाठी महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन अंतर्गत 24 तास शुद्ध पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेसाठी सुमारे दोन कोटींच्या पाईप आणून ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व पाईप शुक्रवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वडगाव हवेली गावच्या ग्रामस्थांना 24 तास पाणी मिळावे, यासाठी मागील काही वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश आल्यानंतर पाणी योजनेची प्रक्रिया सुरू झाली होती. तसेच या योजनेसाठी शासनाने तब्बल 11 कोटी निधी मंजूर केला असून, त्यातून साधारण दोन कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणार्‍या पाईप प्राधिकरणाने एक महिन्यापूर्वी गावात आणून त्याचा वेगवेगळ्या तीन ठिकाणी साठा करण्यात आला आहे. पेयजल योजनेचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. परंतु त्या अगोदरच त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी असलेल्या पाईप लाईनच्या साठ्याला शुक्रवार रात्री एकच्या सुमारास अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल तसेच कराड नगरपालिकाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु शर्थीचे प्रयत्न करूनही मोठे नुकसान झाले आहे. या आगीत पाणी योजनेसाठी आणून ठेवलेल्या पाईप जळून खाक झाल्या असून त्यांची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाणी योजनेवर विपरीत परिणाम…

राज्य शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर प्राप्त झालेल्या निधीतून पाणी योजनेसाठी आवश्यक पाईप आणण्यात आल्या होत्या. मात्र आता या पाईपच जळून खाक झाल्याने याचा पाणी योजनेच्या कामावर परिणाम होईल, असे बोलले जात आहे. याशिवाय या घटनेमागे कोणाचा हात तर नाही ना ? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र सायंकाळपर्यंत नेमकी आग कशामुळे लागली ? हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT