सातारा

सातारा : लोकसभेला भाजप उत्तुंग यश मिळवेल – मंत्री सोम प्रकाश

दिनेश चोरगे

रेठरे बु. ;  पुढारी वृत्तसेवा :  देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सातार्‍यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित महिला संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णादेवी पाटील, जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, जि.प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, सौ. प्रियांका ठावरे, भाजपा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ. सारिका गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ना. सोम प्रकाश म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत शक्तिशाली नेते आहेत. त्यांनी महिलांसाठी अनेक योजना राबवून देशातील महिलांना आत्मनिर्भर बनविले आहे. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणावे. मोदीजींच्या नेतृत्वात सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ नक्कीच फुलेल अशी खात्री वाटते.

देशातील माता-भगिनींच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि त्यांना सशक्त बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना आणल्या असल्याचे सांगून डॉ. अतुल भोसले म्हणाले, महिलांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम उज्ज्वला योजनेने केले आहे. मोदींनी देशातील 9 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. देशात मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आज अनेक माताभगिनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहेत. भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी मोदींचे अनेक प्रयत्न सुरु असून, या प्रयत्नांना बळ मिळवून देण्यासाठी 2024 ला भाजपाच्या उमेदवाराला सातारा लोकसभेतून निवडून देऊया, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
डॉ. सुरभी भोसले म्हणाल्या, माझा राजकीय प्रवास भाजपामधून सुरू झाला याचा मला खूप आनंद वाटतो. लोकसभेची निवडणूक अद्याप लांब असली तरी आपण आत्तापासून तयारीला लागलो आहोत. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निश्चित निवडून येईल, याची मला खात्री आहे.

यावेळी सौ. श्यामबाला घोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी ना. सोम प्रकाश यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर व नर्सेसचा कोविड योद्धा म्हणून प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मलकापूरच्या नगरसेविका नूरजहाँ मुल्ला, सौ. निर्मला काशीद, स्वाती पिसाळ, सीमा गावित, कृष्णा बँकेच्या संचालिका सौ. सारिका पवार, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, दुशेरेच्या सरपंच सौ.सुमन जाधव, जुळेवाडीच्या सरपंच श्रीमती सुरेखा पुजारी, सौ. मनिषा पांडे, सौ. सीमा घार्गे, सुनंदा शेळके यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. संगीता देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सारिका गावडे यांनी आभार मानले.

अतुल भोसलेंना विधानसभेत पाठवा..

डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार दिले. त्यामुळे 2024 ला लोकसभेला कमळाला आणि विधानसभेला अतुलबाबांना मत द्यायचा निर्धार तुम्ही सर्व महिलांनी केला आहे, हे इथे जमलेल्या प्रचंड गर्दीवरुन दिसून येत आहे, असे उद‍्गार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात काढले. अतुलबाबांसारखा सक्षम भाऊ विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT