सातारा

सातारा लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी : आ. जयकुमार गोरे

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलेल्या 144 लोकसभा मतदारसंघांची निवड केली असून त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश हे दि. 28 पासून तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर आहेत. केंद्रीय योजनांची अंमलबजावणी, पक्षाचे संघटनात्मक काम, बुथ कमिट्या, लोकप्रतिनिधींची सक्रियता आदिंची माहिती मंत्री सोमप्रकाश घेणार आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री सोमप्रकाश तीन दिवसांसाठी येत आहेत. दर तीन महिन्यांनी केंद्रीय मंत्री मतदासंघाचा दौरा करणार आहेत. त्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक तयारी, केंद्र शासनाकडून राबवण्यात येणार्‍या योजनांची अंमलबजावणी, लोकांच्या भावना, संघटनात्मक काम, बुथ कमिट्या, लोकप्रतिनिधींची सक्रियता आदि बाबी तपासल्या जाणार आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे आगामी बांधणीसाठी त्याचा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांचे दि. 28 रोजी सकाळी 9 वाजता शिरवळ येथे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर वाई येथे महागणपती मंदिरात कृष्णा नदीकाठावर कृष्णाई आरती होणार आहे. त्यानंतर पदाधिकार्‍यांशी ते चर्चा करणार आहेत. पाचवड येथे सरपंचांची भेट घेवून बुथ रचनेची माहिती घेणार आहेत. त्यानंतर लिंब (ता. सातारा) येथे बुथ अध्यक्षाची भेट घेवून तयारीची माहिती घेणार आहेत.

केंद्र शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती ते घेणार आहेत. त्यानंतर मंत्री सोमप्रकाश हे सातार्‍यात येणार असून भाजप कोअर कमिटीशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर भाजप जिल्हा कार्यकारिणी व सर्व आघाड्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत आयोजित मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सोमप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील डॉक्टर्स, वकील, व्यापारी व सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांसोबत कनिष्क मंगल कार्यालयात बैठक होणार असून त्यामध्ये ते मते जाणून घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केंद्र सरकारकडून राबवल्या जाणार्‍या योजनांची माहिती ते घेणार आहेत. या बैठकीत सहभागी लाभार्थ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. या योजनांचा लाभ घेताना येणार्‍या अडचणी लाभार्थ्यांकडून जाणून घेतल्यावर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

त्यानंतर रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे होणार्‍या जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यास मंत्री सोमप्रकाश उपस्थित राहणार आहेत. सदस्यांची मते जाणून घेवून ते मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर उंब्रज (ता. कराड) येथे सहकारी संस्थांचा अनुभव असणार्‍या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणार आहेत. सुपने येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून आरोग्यविषयक केंद्रीय योजनांची माहिती घेणार आहेत. याठिकाणी कार्यकर्त्यांची भूमिका ते जाणून घेणार आहेत. आटके येथे आयोजित जिल्हास्तरीय भाजप महिला पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यास मंत्री सोमप्रकाश उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दि. 30 रोजी सकाळी मलकापूर ते हुतात्मा स्मारक अशी रॅली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल? खा. उदयनराजे यांना पुन्हा संधी देणार का? असे विचारले असता आ. जयकुमार गोरे म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने दिलेला कार्यक्रम खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले यांच्यासह सर्व भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एकजुटीने राबवतील. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष त्यावेळी निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अतुल भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, अनुप सूर्यवंशी, अ‍ॅड. प्रशांत खामकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे तीनच आमदार; त्यांचाही पराभव होणार

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीची ही व्यूहरचना राज्याची की केंद्रीय भाजपाची असे विचारले असता आ. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. माढ्यासंदर्भातही असेच बोलले जायचे पण त्याठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार निवडून आला. सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचे फक्त तीनच आमदार राहिले आहेत. त्यांचाही पराभव होणार. यावेळी नक्की बदल दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT