सातारा

सातारा : राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षामधीलच लोक गांभीर्याने घेत नाहीत : अजयकुमार मिश्रा

मोहन कारंडे

कराड; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकर व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीची वक्तव्य करणार्‍या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत काय बोलायचे. राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील लोकच गांभीर्याने घेत नाहीत. तर अजित पवारांवर त्यांचे काका शरद पवार यांचा विश्वास नाही, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक प्रमोद जठार, विक्रम पावसकर, धनाजी पाटील, एकनाथ बागडी आदी उपस्थित होते. मंत्री मिश्रा म्हणाले, राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्याने घेत नाही. कारण त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. तसेच अजित पवार यांनीच दबावतंत्र वापरून विरोधीपक्ष नेतेपद मिळविले आहे. ते मुख्यमंत्री पदासाठीही वाटाघाटी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या काकांचाच विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही.

भाजप सातार्‍यासह सर्व महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघात जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करीत आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा मतदार संघात विश्वासपूर्ण काम सुरू असून एक मजबूत संघटन झाले आहे. गेल्या तीन वर्षांत ईडीने केलेल्या कारवाईतून देशात तिनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप हा निराशेच्या भावनेतून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू, काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे. या ठिकाणी पर्यटनास चालना मिळाली आहे. याचबरोबर चीन सीमा भागातही चांगली सुरक्षा यंत्रणा असून एक इंचही चीन अतिक्रमण करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप काम करणारा पक्ष आहे. देशातील सर्व धर्मीय लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे लक्ष्य ठेवून पक्ष काम करत आहे. देशाच्या सेवा, सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रश्नांवर काम सुरू असल्यामुळेच भाजप सत्तेत आली आहे. देशांतर्गत समस्या सोडवून जागतिक स्तरावर देशाला समृध्द, शक्तीशाली बनविण्याचे काम भाजप करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT