सातारा

सातारा : राजम्यानेे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

दिनेश चोरगे

पिंपोडे बुद्रुक;  कमलाकर खराडे :  उत्तर कोरेगाव तालुक्यात खरीप हंगामात घेवडा (राजमा) हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र, सध्या या राजम्यानेच शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अतिपावसामुळे पीक वाया गेले आहेच. पण, त्याशिवाय कसे बसे तग धरून बचावलेल्या या पिकाला बाजारभावही मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

यावर्षी झालेल्या अनपेक्षित पावसाने शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन, बटाटा या पिकांबरोबरच कडधान्येही वाया गेली आहेत. वाटाण्याचे पीक तर पूर्णपणे नासून गेले. वरुण घेवड्याचे कसेबसे वाचलेले पीक काढताना शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. एकरी आठ ते दहा पोती मिळणारे उत्पन्न एक ते दोन पोत्यांवर आले आहे. उत्पादनात प्रचंड घट असताना दुसर्‍या बाजूला बाजारभावही गडगडले आहेत. सुरुवातीला असलेला आठ ते साडे आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या पाच हजारांच्या खाली आला आहे. व्यापारी शेतकर्‍यांची गळचेपी करत असल्याचे दिसून येत आहे.

रंग, आकार, मालात असलेला ओलसरपणा, याशिवाय ठराविक रकमेचा व्यवहार झाल्यास व्यापार्‍यांना भरावा लागणारा जीएसटी अशी कारणे देऊन कवडीमोल दराने घेवडा खरेदी केला जात आहे. त्यातून शेतकर्‍यांना केलेला खर्चही पदरी पडत नाही.
देऊर, तळीये, बिचुकले, नलवडेवाडी, जाधववाडी, विखळे या गावातील घेवडा पीक पूर्णतः खराब झाले आहे. अनेक शेतकर्‍यांचे पिक कुजून गेले आहे. तर, काहींची काढणी झालेले पीकसुध्दा खराब झाले. खराब झालेला घेवडा पॉलिश करण्यासाठी शेतकरी मिलमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.

खरेदीत स्पर्धा, तरीही दर कमी

घेवड्यास (राजमा) दिल्ली, पंजाब व काश्मीरमध्ये मोठी मागणी असते. घेवड्याची काढणी सुरु झाल्यावर दिल्लीतील व्यापारी सातार्‍यात तळ ठोकून असतात. खरेदीसाठी मोठी स्पर्धा असते. तरीही दर मात्र कायम जेमतेमच असतो. शासनाने राजम्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत. त्याकडे सरकार कायम दुर्लक्ष करत आहे.

SCROLL FOR NEXT