संग्रहित फोटो  
सातारा

सातारा : म्हाळाच्या नैवेद्याचे ताट…भाज्यांचा वाढला थाट

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सध्या पितृपंधरवडा असल्याने श्राध्द म्हणजेच म्हाळाच्या जेवणावळीला बहर आला आहे. कोणत्याही श्राध्दाच्या नैवेद्यामध्ये शाका-भाज्यांना विशेष महत्व असते. सध्या घरोघरी म्हाळाचे नैवेद्य होत असून त्यामध्ये सर्व शाका-भाज्यांचा थाट वाढला आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. दर कडाडले आहेत. म्हाळाच्या जेवणासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक फोडणी बसत आहे.

पितृपंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मृती जागवून त्यानिमित्त श्राध्दाचे जेवण घातले जाते. सध्या हा पितृपंधरवडा सुरु असून श्राध्द जेवणावळीला बहर आला आहे. या जेवणासाठी पुरणपोळीचा बेत आखला जातो. मात्र सोबतीला सर्व शाका-भाजा आवश्यक असतात. श्राध्दाच्या नैवेद्यात डेसा, भेंडी, गावार, आळू वडी, कारले, काकडी, मेथी, बटाटा अशा सर्व भाज्यांचा थाट वाढला आहे. केवळ पंधराच दिवस श्राध्द जेवण घातलं जात असल्याने या पंधरवड्यामध्ये भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही कडाडले आहेत. ठेसा, कारले यांसारख्या काही भाज्या तर केवळ श्राध्दाच्या जेवणातच खाल्ल्या जातात. एरवी फारसी मागणी नसते. मात्र म्हाळासाठी आवश्यक असल्याने एका ठेस्याच्या जुडीला 20 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत. बहुतांश भाज्या 80 ते 90 रुपये किलोनेच विकल्या जात आहेत. त्यातच अनेकजन देवी उठेपर्यंत शाकाहारालाच प्राधान्य देत असल्याने मेथी कोथिंबीरीसह सर्वच भाज्या महागल्या आहेत. आधीच गॅस व इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला म्हाळाच्या नैवेद्यासाठीही आर्थिक फोडणी बसत आहे.

शेवग्याच्या दराचे दीडशतक पार

वर्षभर उपलब्ध असणारी शेेंगभाजी म्हणून शेवग्याची ओळख आहे. मुबलक प्रमाणात खनिजे अल्याने आरोग्यवर्धक म्हणून बहुतांश लोक शेवग्याचा आहारात आवर्जून समावेश करतात. मात्र या मान्सूनमध्ये पावसाने शेवग्याची फुले झडल्याने फळधरणी कमी झाली आहे. परिणामी सद्यस्थितीत बाजारपेठेत शेवग्याची आवक कमी झाली आहे. शेवग्याने दराचे दीडशतक पार केले आहे.40 रुपये किलोच्या दरात सध्या शेवगा पावकिलो मिळत असल्याने सांबरातूनही शेवगा गायब झाला आहे.

कोथिंबीरीचा तोरा…

म्हाळाच्या जेवणामध्ये सर्रासपणे पुरणपोळीचा बेत आखला जात आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे म्हाळ जेवणावळीवरही टाच आली होती. त्यामुळे म्हाळाचे सोपस्कारही घरगुतीच केले जात होते. त्याची कसर यंदा भरुन निघत असल्याने मोठ्या प्रमाणावर पंगती उठवल्या जात आहेत. पुरणपोळीच्या स्वयंपाकात कटाच्या आमटीची चव कोथिंबीरीशिवाय येत नाही. त्यातच पावसामुळे आवकही घटली आहे. परिणामी मंडईमध्ये काथिंबीर दरात तेजी आली असून एका जुडीसाठी तब्बल 30 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT