रिव्हॉल्व्हर 
सातारा

सातारा : मुलाकडून वडिलांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

दिनेश चोरगे

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा :  आपणास मुलगा, सून, नातू, नात सुनेसह अन्य पाच ते सहा जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबर मारहाण केली. तसेच जबरदस्तीने संपत्ती हडप करण्यासाठी बेकायदेशीरपणे कुलमुखत्यार पत्र व बक्षीस पत्र करून घेण्यात आल्याची तक्रार उंब्रज (ता. कराड) येथील प्रल्हाद गणपती घुटे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी रविवारी उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नितीन घुटे (मुलगा), सौ. वंदना घुटे (सून), शुभम घुटे (नातू), टीना घुटे (नात सून, सर्व रा. उंब्रज) यांच्यासह उत्तम आनंदा केंजळे (चरेगाव), कल्याण खामकर (कारंडवाडी), गणेश बबन पोटेकर (मुंढे), संदीप हणमंत पोतले (मुंढे), दिगंबर रघुनाथ माळी
(मलकापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

प्रल्हाद घुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वकष्टार्जित नितीराज या बंगल्यात राहण्यास असून याठिकाणी मुलगा नितीन हा वारंवार तुमची सर्व संपत्ती माझ्या नावावर करा असा तगादा लावत होता.स्वकष्टार्जित मिळकती हडपण्याच्या उद्देशाने तसेच सर्व मिळकती बक्षीस पत्राने द्याव्यात, या हेतूने मुलगा, सून, नातू, नात सून यांनी संगनमताने आपणास पहिल्या मजल्यावरील खोलीत कोंडून ठेवत खोली बाहेर पडण्यास बंदी घातली. तसेच मुलगी, जावई व नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव केला. नातेवाईक मला भेटण्यास आल्यानंतर पाळत ठेवली जात होती. तसेच आपल्यावर दबाव टाकून मानसिक खच्चीकरण करण्यासोबत उपाशीपोटी ठेवले जात होते. 12 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत मुलगा, सून, नातू तसेच नात सून संपत्ती बक्षीस पत्र करून देण्यासाठी दमदाटी करत होते. याचवेळी मुलगा नितीन याने रिव्हॉल्व्हर घेवून दमदाटी केल्याचा दावा तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

नितीन याने माझे समोर रिव्हॉल्व्हर ठेवून ठार मारण्याची धमकी देत मी जिथे सांगेन, त्या ठिकाणी सही व अंगठा करायचा असा दबाव टाकून 22 सप्टेंबरला व 3 ऑक्टोंबरला कराड येथील रजिस्टर नोंदणी ऑफीसमध्ये नेले. त्या ठिकाणी अन्य संशयितांनी आम्ही दस्त करते वेळी साक्षीदार आहोत, मुलगा म्हणतोय तसे करुन टाका नाहीतर तुम्हाला जड जाईल अशी दमदाटी केली. तसेच त्यावेळी इच्छेविरुद्ध मारहाण करुन माझी मालमता जबरदस्तीने घेणेसाठी भाग पाडून कुलमुखत्यार पत्र हे मुलगा याने स्वतःचे नावे व बक्षिस पत्र नातू शुभम घुटे याचे नावे बेकायदेशीर पद्धतीने करुन घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच दिनांक 12 सप्टेंबरला विश्वासाचा गैरफायदा घेऊन माझ्या परवानगी शिवाय माझ्या ऑफिसमध्ये येत उत्तम केजळे, शुभम घुटे व ड्रायव्हर कल्याण खामकर यांनी माझ्या संपूर्ण प्रॉपटीचे ओरिजीनल फाईल, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, चेकबुक, पासपोर्ट साईजचे फोटो या वस्तू नेल्या असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक आबा जगदाळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT