सातारा : विशाल गुजर
कुस्तीतील सर्वोच्च मानांकन समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा सातार्यात होत आहे. ही 64 वी स्पर्धा असून ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुस्ती क्षेत्रातील मोठा फौजफाटा कार्यरत आहे. या स्पर्धेत 5 आखाड्यांमध्ये 900 मल्ल आपआपसात भिडणार आहेत. 100 पंच निकालाची धुरा सांभाळणार आहेत. या स्पर्धेसाठी साातरा सज्ज झाला आहे.
तब्बल 59 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा बहुमान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. दि. 4 ते 9 एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेची जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाकडून युध्दपातळीवर तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 900 मल्ल, 100 पंच आणि 100 टीम मॅनेजर असे एकूण 1100 जण येणार आहेत. 100 पंचांची क्रीडाधिकारी कार्यालयात राहण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय मैदानावरील सुविधांसह 50 हजार प्रेक्षक बसणार्या ठिकाणची रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पाच आखाडे असणार असून यात 2 मातीचे आखाडे तर 3 मॅटचे आखाडे आहेत. या पाच मॅटवर कुस्त्यांचा डाव रंगणार आहेत. मातीचा आखाडा हा 9 मीटर व्यासाचा असणार आहे तर मॅटचा आखाडा 12 मीटरचा असणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यासह महानगरातील असे 45 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात माती गटात व मॅट गटात वेगवेगळे स्पर्धेत वजन गटानुसार राहणार आहेत.
महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्यासाठी एका पैलवानाला 6 ते 8 पैलवानांना चितपट करावे लागणार आहे. त्यानंतर माती व मॅटवरील टॉपला असणार्या मल्लांमध्ये मुख्य लढत होणार आहे. ही मुख्य लढत मॅटवर होणार असून अवघ्या 6 मिनिटात महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरणार आहे. महाराष्ट्र केसरीसाठी 86 किलो वजनगटावरील मल्लांमध्ये लढत होणार आहे. यात 40 ते 45 मल्ल प्रत्येकी मॅट व मातीसाठी येणार आहेत.
जिल्ह्यात 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या उदघाटनास मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना आणण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. तर महाराष्ट्र केसरीची गदा खा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.