सातारा

सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानधनाचा आकडा ठरणार कधी?

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मातीतला रांगडा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्या मल्लाचा आजपर्यंत मानधनाचा आकडा ठरला नाही. अहमदनगर येथे महाराष्ट्र केसरी मैदान भरवण्याच्या अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानासह विविध वजनी गटासह महाराष्ट्र केसरी विजेत्याच्या मानधनाचा आकडा कधी ठरवणार? अशी विचारणा होऊ लागली आहे. संयोजकांच्या मनावर नको तर ठोस मानधन मिळावे, असा कुस्तीक्षेत्रातून सूर उमटू लागला आहे.

महाराष्ट्राचे कुस्तीक्षेत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेने ढवळून निघते. हजारांहून अधिक कुस्तीगिरांच्या चीतपट, चिवट आणि शर्थीच्या झुंजी याच स्पर्धेत दिसून येतात. ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद विजेत्याला होतोच, परंतु त्याला मिळणारा मानही कणभर ऑलिम्पिक विजेत्यापेक्षा जास्त असल्याने आपल्या कुस्ती कारकिर्दीत महाराष्ट्र केसरी होण्याच स्वप्न प्रत्येक कुस्तीगीरचे असते.
पुण्यात 1953 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना होताच महाराष्ट्रातील अजिंक्य मल्ल ठरवण्यासाठी एक स्पर्धा भरवण्याचा विचार कुस्तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या मनात आला. त्यावेळी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्यासह स्व. भाऊसाहेब हिरे, स्व. बाळासाहेब देसाई हे या परिषदेच्या कार्यकारिणीवर होते. मुंबई येथे 1955 मध्ये दुसरे अधिवेशन झाले तेव्हाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू करण्यात आली.

त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्र केसरीचे मैदान भरवले जाते. महाराष्ट्र केसरी मैदानाच्या संयोजकांवर मानधनाचे स्वरूप अवलंबून आहे. केवळ पदक, प्रमाणपत्रावर समाधान मानलेले ज्येष्ठ पैलवान आज पाहायला मिळतात. परंतु, काळानुरूप स्पर्धेचे बदलेले स्वरूप आणि वाढलेला राजकीय हस्तक्षेप यामुळे संयोजकांकडून मानधन देण्यास प्रारंभ झाला. परंतु, प्रत्येक स्पर्धेत मानधन समान नसते. महिन्याभरापूर्वी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस पडला. पुढील स्पर्धा अहमदनगर येथे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. वाढत्या महागाईत खुराकासह प्रवास, जेवण, नाश्ताचा खर्च भागत नसल्याने ठोस मानधन असावे, अशी पैलवानांची मागणी आहे. पूर्वी मैदानात लढत जिंकल्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप पडायची पण आता ते दिवस राहिले नाही. पैलवानांच्या हाती पैसा पडला तरच त्याला कुस्तीत बारकाईने सराव करता येईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने प्रत्येक स्पर्धेत कुस्तीगिरांना ठोस मानधन मिळावे, यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

1961 नंतर चांदीची गदा देण्यास प्रारंभ

महाराष्ट्र केसरीचा पहिला मान विष्णू नागराळे यांना 1955 मध्ये मिळाला असता. तरीही त्यांच्याच तालमीतील, त्यांच्याच शिष्यानेही पहिली गदा आणून त्यांची शान वाढवली होती. दह्यारीच्या केसरी पदानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची प्रतिष्ठा स्पर्धागणिक उंचावत गेली. 1953-60 पर्यंत विजयी मल्लांना मेडल दिले जायचे. त्यानंतर 1961 नंतर चांदीची गदा देण्यास सुरुवात झाली. ती आजही सुरूच आहे. त्यात 1961 ते 1982 पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चांदीची गदा देत होते. त्यानंतर स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ मोहोळ कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून विजेत्यास चांदीची गदा देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT