सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर व वाई तालुक्यातील पश्चिम भाग हा अतिदुर्गम व डोंगराळ असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वीजेची गैरसोय होते. रॉकेल नसल्यामुळे दिवाबत्तीचीही सोय होत नाही. पाटण तालुका दुर्गम असल्याने त्या तालुक्यात रॉकेल पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे महाबळेश्वर व वाई तालुक्यातील पश्चिम भागात देखील रॉकेल पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावी आले होते. यावेळी विराज शिंदे यांनी त्यांची भेट घेवून वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील समस्या मांडल्या. महाबळेश्वर, वाई तालुक्यातील पश्चिम भाग हा अतिदुर्गम व डोंगराळ आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात याठिकाणी वीजेची गैरसोय होते. जळणाचे लाकूड ओले झाल्यामुळे नागरिकांना चूल देखील पेटवण्यास अडचणी निर्माण होतात. रॉकेल नसल्यामुळे दिवाबत्तीचीही सोय होत नाही अशी अवस्था आहे. तर जिल्ह्यातील पाटण तालुका दुर्गम असल्याने त्या तालुक्यात रॉकेल पुरवठा केला जातो हा दुजाभाव आहे. मुख्यमंत्र्यांनी समस्या समजून घेऊन ऑन द स्पॉट निर्णय घेतला. तात्काळ रॉकेल पुरवठा करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली. यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव नाना वाडेकर, महाबळेश्वर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मानाजी धनावडे, वाई तालुका काँग्रेसचे सरचिटणीस विष्णुपंत काकडे, वाई विधानसभा सोशल मीडियाचे अध्यक्ष विकास जाधव व महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.