सातारा

सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार, एक जखमी

Arun Patil

तारळे ; पुढारी वृत्तसेवा : तारळे विभागातील डोंगर परिसरात बिबट्याची दहशत वाढत आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान जिमनवाडी, ता. पाटण येथे रानात चरायला गेलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. एक शेळी घेऊन बिबट्या पसार झाला. तर दुसरी शेळी गंभीर जखमी झाली आहे.

गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत असल्याने गवत फुटू लागले आहे. यामुळे गुरे ढोरे शिवारात चरण्यासाठी फिरू लागली आहेत. जिमनवाडी येथीलही लोक गुरे ढोरे,शेळ्या घेऊन जात आहेत. धावडदरा नावच्या शिवारात काही शेतकरी गुरे-ढोरे, शेळ्या घेऊन गेले होते.

दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक शेळ्यांची पळापळ झाली.एख शेळी जोरजोरात ओरडत शेतकरी बसलेल्या ठिकाणाकडे पळत आली.तिच्या नरड्यावर बिबट्याचे दात रुतलेले व त्यातून रक्त पडताना दिसले.शेतकर्‍यांनी शेळ्या चरत असलेल्या दिशेने धाव घेतली पण बिबट्या दिसून आला नाही.पण एक शेळी मात्र कमी असल्याचे दिसले. इतरत्र शोध घेतला पण शेळी मिळून आली नाही. यामध्ये विश्वास अंबाजी मोहीते यांची शेळी बिबट्याने पळवून नेली. तर दिनकर रामचंद्र मोहिते यंची शेळी गंभीर जखमी झाली आहे.

या परिसरात वारंवार बिबट्या शेळ्यांवर हल्ले करत असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. बिबट्याच्या वावरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वनविभागाने बंदोबस्त करावा

या विभागात अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने बिबट्यासाठी सापळा लावावा अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT