सातारा

सातारा : बाजारपेठेत डेकोरेटिव्ह पणत्यांची चलती

दिनेश चोरगे

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  दिव्याचा सण म्हणून दिवाळीची ओळख आहे. मातीच्या पारंपारिक पणत्यांना लेस, मोती, कुंदन जोडून आधुनिकतेचा साज दिला जात आहे. नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत डेकोरेटीव्ह पणत्यांची चलती आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील सामाजिक संस्था व महिला बचत गटांकडून अशा पणत्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. पणत्या सजवण्याच्या कामातून गरजू मुलांच्या हाताला काम मिळत असल्याने गरीबांची दिवाळी गोड होणार आहे.

प्रकाशाच्या लखलखाटामुळे दिवाळीच्या सणात खरी वातावरण निर्मिती होत असते. म्हणून दिवाळीत संपूर्ण पाच दिवस घरोघरी, मंदिरांमध्ये पणत्या लावल्या जातात. गरीब-श्रीमंत, लहान असो वा मोठा आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येक स्तरातील नागरिकांकडून यथाशक्य दिवाळी साजरी केली जाते. सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या साहित्याची रेलचेल वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर व परिसरामध्ये अनेक ठिकाणी पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. साध्या मातीच्या भाजलेल्या पणत्या, चिनी मातीच्या तसेच युज अ‍ॅण्ड थ्रो अशा विविध प्रकारच्या पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्येही यंदा नव्याने दाखल झालेल्या डेेकोरेटीव्ह पणत्यांची बाजारपेठेत चलती आहे.

डेकोरेटीव्हमध्येही रेडीमेड मेणाच्या तसेच तेल घालून वात लावण्याच्या अशा दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. सातारा शहरासह ग्रामीण भागातील सामाजिक संस्था व महिला बचत गटांकडूनही अशा पणत्या मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत. मातीच्या पारंपारिक पणत्यांना लेस, मोती, कुंदन जोडून आधुनिकतेचा साज दिला जात आहे. त्यामुळे या पणत्यांना नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पणत्या सजवण्याच्या कामातून अनेक गरजू महिला व युवतींच्या हाताला काम मिळत असल्याने गरीबांची दिवाळी गोड होणार आहे.

दिव्यांगांची उदरनिर्वाहासाठी धडपड…

दिव्यांग व विशेष व्यक्ती सामाजिक संस्थांच्यावतीने सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर हंगामी व्यावसायासाठी बाजारपेठेत उतरुन उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्न केला जातो. रक्षाबंधन, गणपती, दिवाळी अशा सणांना या व्यावसायिकांच्या वस्तूंना चांगली मागणी असते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्या, उटणे, आकाशकंदिल तयार केले जातात. सध्या अशा दिव्यांगांनी तयार केलेले दिवाळी किट बाजारपेठेत दाखल झाले असून नागरिकांमधून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

SCROLL FOR NEXT