लोणंद; पुढारी वृत्तसेवा : लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर गुरुवारी रात्री एस.टी. व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील तीन युवक जागीच ठार झाले. हा अपघात नक्की कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. या अपघातामुळे परिसरात काहीकाळ वाहनांची गर्दी झाली होती. ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे व अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एस.टी. बस (एम. एच. 20 बी. एल 4158) मंगळवेढाहून पुण्याकडे निघाली होती. तर एम. एच. 12 आर. व्ही 3158 या दुचाकीवरून तिघेजण निरेकडून लोणंद बाजूला येत होते. ही दोन्ही वाहने रेल्वे उड्डाणपुलावर आल्यानंतर बस व दुचाकी समोरासमोर धडक झाली. या अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर व पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.