सातारा; पुढारी वृत्तसेवा : नाक दाबले की तोंड उघडते असे म्हणत महावितरण विभागाने 31 मार्चपूर्वी जिल्ह्यातील शेकडो थकबाकीदारांचे वीज कनेक्शन खंडित केले. यात घरगुती ग्राहक देखील भरडले गेले. मात्र, बड्या धेंडांनी लाखोंची थकबाकी असलेल्यांचे काय? असा सवाल वीज ग्राहक उपस्थित करत असून ठिकठिकाणी महावितरण कर्मचारी व वीज ग्राहकांमध्ये बाचाबाची होत असल्याचे चित्र आहे.
विजेची वाढती मागणी, कोळसा टंचाई अशा अनेक समस्यांतून मार्गक्रमण करत असताना महावितरण विभागाने वीजचोरीच्या शेकडो घटना उघडकीस आणल्या. थकबाकीदारांचे वीज कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू केली. वीज मीटरमध्ये फेरफार करणार्यांचे मीटरही जप्त केले. जिल्ह्यात 3 लाख 43 हजार 657 घरगुती वीज ग्राहक असून त्यांच्याकडे 15 कोटी 86 लाख 65 हजार रुपये थकबाकी आहे. वाणिज्यचे 28 हजार 926 ग्राहक असून 4 कोटी 96 लाख 54 हजार थकबाकी तर औद्योगिकचे 6 हजार 652 ग्राहक असून त्यांच्याकडे 3 कोटी 22 हजार 32 हजार रुपयांची थकबाकी आहे. यातील अनेक ग्राहकांवर महावितरणकडून ठोस कारवाई केली नाही.
जिल्ह्यातील कृषीबरोबरच पाणी योजना व पथदिव्यांची थकबाकी सर्वाधिक आहे. महावितरणकडून विभागाने ही थकबाकी जरूर वसूल करावी मात्र, लाखोंची थकबाकी असलेल्यांचे काय? असा सवाल ग्राहक करत आहे. या कारणावरूनच ठिकठिकाणी महावितरण कर्मचारी व वीज ग्राहकांमध्ये बाचाबाची होत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके, तसेच सोलापूर व सातारा हे जिल्हे येतात. येथील तब्बल 27 लाख 35 हजार वीज ग्राहकांना सेवा पुरवण्याचे काम बारामती परिमंडल करत आहे. मात्र, कृषी ग्राहकांची थकबाकी सर्वाधिक असल्याने ती वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणपुढे आहे. कृषी धोरणांतर्गत थकबाकीवर 50 टक्के सवलत देऊनही 1 लाख 86 हजार ग्राहकांपैकी 76 हजार 408 ग्राहकांनी या योजनेला लाभ घेतला नाही.