सातारा

सातारा : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न युद्धपातळीवर सोडवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

backup backup

सातारा/बामणोली : पुढारी वृत्तसेवा : आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याने लोकांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद आहे. या सरकारच्या कालावधीत पुनर्वसनाचे प्रश्‍न युद्धपातळीवर सोडवले जातील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मायभूमीत मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या स्वागताने मन भरून आले आहे. सातारा जिल्हा हा पर्यटनासाठी वाव असलेला जिल्हा आहे. आमचे सरकार सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

ना. एकनाथ शिंदे हे मूळचे महाबळेश्‍वर तालुक्यातील दरे-तांब या गावचे आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री रात्री तापोळ्यात पोहोचले. पत्रकार परिषदेत त्यांना विविध प्रश्‍नांवर बोलते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी पत्रकारांनी तुम्ही भूमिपुत्र असून, गेली 50 वर्षे कोयनेच्या भूमिपुत्रांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत, आता तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत? असे विचारले असता त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. ना. देवेंद्र फडणवीस व मी या सरकारच्या मंत्रिमंडळाचे काम पुढे नेत आहोत. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कामगारांचे व समाजातील प्रत्येक घटकाचे आहे. त्यांच्यातील माणूस आता मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढणे हे साहजिकच आहे. त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पूनर्वसनाचे प्रश्‍न रखडले आहेत ते सोडवणार का? या प्रश्‍नावर बोलताना ना. एकनाथ शिंदे म्हणाले, हे प्रश्‍न युध्दपातळीवर सोडवले जातील. भूमिपूत्रांनी जागा दिली. कोयना धरण झालं सर्वांना प्रकाश दिला. ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या युध्दपातळीवर सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याने येथील लोकांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद आहे. स्वागत सत्कार खूप होत असतात. मात्र मायभूमीतील सत्कार हा वेगळाच असतो.

जिल्ह्यातील पर्यटनावर बोलताना ना. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाला भरपूर वाव असून पर्यटनाला चालना देण्याचे काम आमचे सरकार करेल. लोकांना जे प्रकल्प फायद्याचे आहेत.त्याचा सकारात्मक विचार आमचे सरकार करणार आहे. आमचं सरकार डबल इंजिन आहे. त्यामुळे निधी हा डबल होणार आहे. कारण आमच्या सरकारला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे. विकास करा, केंद्र सरकारकडून भरघोस निधी देण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले आहे. नक्की या भागासाठी जे काय करता येईल ते चांगले करणार आहे. विकासाच्यादृष्टीने तरूणांना रोजगार उपलब्ध होईल, पर्यटनाला चालना मिळेल, इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलप करता येईल. येथे निसर्ग संपदा भरपूर आहे. नक्की विचार करुन या भागाचा विकास केला जाणार आहे. भागातील 2 ते 3 पूल प्रस्तावित आहेत त्यातील एका पूलाचे काम पूर्ण झाले आहे. बाकी पूल वरळीच्या धरतीवर केबल स्टेड करत आहोत. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या कनेक्टिव्हिटी करावयाच्या आहेत त्याचा निर्णय लवकरच होईल, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीमंडळ आता स्थापन झाले असून सर्व काही व्यवस्थित होईल आणि मंत्र्यांचे खातेवाटपही लवकरच केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT