सातारा

सातारा : पीओपी बंदीनंतरही प्रदूषणाचा आवळणार फास

दिनेश चोरगे

सातारा; मीना शिंदे :  पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणत प्रशासनाचा घसा कोरडा झाला. मात्र, जनजागृती करूनही यावर नागरिकांनी प्रतिसाद न दिल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झालाच नाही. त्यामुळे केंद्राने अखेर पीओपी मूर्तींवर बंदी घालून याला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदाही पीओपी मूर्ती घरोघरी बसवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि प्रदूषण ही दोन्ही उद्दिष्टे यंदाची फोल ठरली आहेत. पीओपी मूर्ती बंदीनंतरही प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचेच वास्तव आहे.

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दिवाळी या सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यातही गणेशोत्सवामध्ये पीओपीचा वापर वाढत असल्यामुळे जास्त प्रदूषण होते. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सवासाठी शासनाकडून आवाहन केले जाते. मात्र, हवा तसा परिणाम होत नसल्याने पीओपी बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून जिल्ह्यात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यामध्ये बहुतांश मूर्ती या पीओपीच्या आहेत. पीओपी पाण्यात विरघळत नाहीत. तसेच त्यासाठी वापरात आलेल्या रंगद्रव्यांमधील रासायनिक घटकांंमुळे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.
पीओपी मूर्ती बंदीच्या निर्णयाने मूर्तिकारांचे नुकसान होवून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळणार होते. मूर्तिकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने यंदा पीओपी मूर्तींना सूट देण्यात आली. त्यामुळे घरोघरी सुमारे 70 ते 80 टक्के गणेशमूर्ती या पीओपींच्या आहेत. या मूर्तींचे विसर्जन जिल्ह्यात नदी, विहीर, तलाव याठिकाणी होणार आहे. त्यामुळे या जलस्रोतांचे प्रदूषण होणार आहे.

पर्यावरणपूरक साहित्य व पर्याय उपलब्धतेची गरज

बहुतांश परप्रांतीयांकडून पीओपी मूर्ती तयार केल्या जातात. शाडू मातीच्या तुलनेत कमी खर्च व उत्पन्‍न जास्त मिळत असल्याने स्थानिक कारागीरही पीओपीचा वापर करू लागले आहेत. पीओपी बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. त्यांना कमी किंमतीमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा पुरवठा करुन तसेच इतर व्यवसायासाठी शासनाने सहकार्य करण्याची मागणी कारागिरांमधून होत आहे.

SCROLL FOR NEXT