सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिली असल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी पेरणी केलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात थोडा पाऊस झाल्यानंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात धूळवाफेवर पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरू आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागात पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन पडत आहे. म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
काही शेतकर्यांनी पिके भिजवण्यास सुरुवात केली असली तरी ज्या शेतकर्यांकडे पाण्याचे साधन नाही त्यांची पिके वाळू लागली आहेत. बहुतांश ठिकाणी ऊस पीक वाळले आहे. पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यांत अद्यापही खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. पश्चिम भागातील भात लागणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. शिवाय पाणी टंचाईबरोबर चारा टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर उभी राहू शकते. पाऊस लांबल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पावसाने पूर्णत: उघडीप दिली होती. दिवसभर अधूनमधून ऊन, तर कधी ढगाळ वातावरण होते.
गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : सातारा 2.6 मि.मी., जावली 3.2 मि.मी., पाटण 11.9 मि.मी., कराड 1.0 मि.मी, कोरेगाव 0.3 मि.मी., खटाव 0.3 मि.मी., खंडाळा 0.1 मि.मी., वाई 0.2 मि.मी., महाबळेश्वर 13.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.