सातारा

सातारा: पावसाचा जोर कायम; धरण साठ्यात वाढ

मोनिका क्षीरसागर

सातारा;पुढारी वृत्तसेवा: सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली तालुक्याच्या पश्‍चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, बोरणे घाटात रस्त्यावर दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात नदी, नाले व ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता हे कळेनासे झाले आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे कास, ठोसेघर, यवतेश्‍वर, बामणोली, तापोळा,पाचगणी, महाबळेश्‍वर येथे पावसाळी पर्यटनांसाठी पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे.

सातारा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 36.30 मि.मी., जावली 58.10 मि.मी., पाटण 74.10 मि.मी., कराड 32.40 मि.मी., कोरेगाव 16.10 मि.मी., खटाव 9.0 मि.मी., माण 5.0 मि.मी., फलटण 5.60 मि.मी., खंडाळा 23.10 मि.मी., वाई 36.60 मि.मी., महाबळेश्‍वर 155.00 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

SCROLL FOR NEXT