पाटण; गणेशचंद्र पिसाळ : अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख पाऊल ठरलेल्या पवन ऊर्जा उद्योगाला गेल्या काही वर्षात शासकीय उदासिनतेमुळे ग्रहण लागले होते. अनेक उद्योजकांनी परराज्याचा सोयीस्कर मार्ग स्विकारल्याने स्थानिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे याबाबत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दै. 'पुढारी'नेही यासाठी वेळोवेळी परखड भूमिका घेतली होती. आता या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने अपेक्षित निर्णय घेतल्याने राज्यात पुन्हा नव्या जोमाने हा उद्योग उदयास येण्याची आशा निर्माण झाली आहे.
पाटण तालुक्यात मागील तीस वर्षात पवनचक्की उद्योग उदयास आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार व विक्रमसिंह पाटणकर यांच्या दूरद़ृष्टीतून अशिया खंडातील सर्वोत्तम पवन ऊर्जेचे ठिकाण म्हणून पाटणला मान्यता मिळाली. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात शासन, पर्यावरण अथवा अन्य विभागांच्या जाचक अटी, नियमावलींमुळे या उद्योगाला ग्रहण लागल्याने अनेक उद्योजकांनी परराज्यांची वाट धरली.
पूर्वीच्या 350 ते 1100 किलोवॅट क्षमतेच्या पवनचक्क्या टॉवर उभे होते. आता अशाच ठिकाणी नव्या अत्याधुनिक तब्बल दोन मेगावॉट क्षमतेपर्यंतचे टॉवर उभे करण्यासाठी शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. या निर्णयामुळे जमिनी, रस्ते, वीज वितरण व्यवस्था, सबस्टेशन या सर्व मुलभूत सुविधांचा चांगल्या प्रकारे वापर होईल. त्याचबरोबर वीज निर्मितीचे संकटही दूर होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय वीज निर्मितीसाठी महागडा कोळसा, गॅस, थर्मलच्या टंचाई व अडचणीतून सुटका होईल. अतिरिक्त वीज निर्मिती होत असतानाच स्थानिकांना जादा चांगले रोजगार, व्यवसाय उपलब्ध होतील. प्रदूषण विरहित वीज निर्मितीमुळे कोट्यावधींच्या खर्चाची बचत होईल व राज्याच्या महसुलात अब्जावधींची भर पडण्यास मदतच होणार आहे.
अपारंपारिक क्षेत्रातील हा उद्योग देशाला प्रगतीपथावर नेईल. जनहितार्थ सातत्याने केलेला पाठपुरावा कामी आला. दै. 'पुढारी'ने याबाबत परखड भूमिकेचेही यात मोठे यश आहे.
– विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री