सातारा

सातारा : पाऊसमानात 60 वर्षांत आमूलाग्र बदल

दिनेश चोरगे

पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  कोयना परिसरात सन 1961 ते 2021 या 60 वर्षांच्या कालखंडात पावसाचे अनेक चढउतार पहायला मिळाले आहेत. कधी महाकाय पावसामुळे महापूर, ओला दुष्काळ तर कधी पाण्याअभावी झालेले हालही पाहिले आहेत. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर पाणी अडविण्याचे फार मोठे काम झाले. यातून राज्याला सिंचनासह वीजही मिळाली. परिणामी दरवर्षी पडणारा एकूण पाऊस व अलीकडच्या काळात कमी कालावधीत विक्रमी पाऊस व ग्लोबल वॉर्मिंगचे धोके लक्षात घेता पर्यावरण रक्षणावर अधिकाधिक भर देणे गरज असल्याचेआकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

कोयना विभागात कोयना ते महाबळेश्वर (तापोळा) या शिवसागर जलाशयात पडणार्‍या पावसावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राच्या विजेसह सिंचन व कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील सिंचनाची गरज अवलंबून असते. सन 1961 ते 2021 या 60 वर्षांच्या कालखंडात अनेकदा कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पावसाचे प्रमाण अनपेक्षितपणे बदलत असल्याचेही समोर येत आहे. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम लक्षात घेता अलीकडच्या काळात येथे कोणत्याही हंगामात पाऊस पडू लागला आहे. मध्येच सर्वाधिक पावसाची नोंदही झाली आहे. परंतु, यामध्ये हमखास व खात्रीशीर अंदाज मात्र कोणीही देऊ शकणार नाही हेही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. गतवर्षी जुलै महिन्यात धरणांतर्गत विभागात मागील शंभर वर्षांचे विक्रम मोडीत काढणारा कमी काळातील सर्वाधिक पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर तांबडी माती तथा गाळही आला.

निसर्ग चक्राचा दुष्परिणाम आता सर्वच पातळ्यांवर पाहायला मिळत आहे. पूर्वी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा पावसाचा कालावधी असायचा. परंतु, गेल्या काही वर्षात जूनमध्ये अत्यल्प पाऊस पडतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत हाच पाऊस सातत्याने आपली वेगवेगळी रूपे दाखवतानाही पहायला मिळत आहे. निश्चितच या बदलत्या निसर्गाचा अभ्यास करून हवामान खाते, प्रशासन व शेतकर्‍यांमध्ये याची जागृती झाली तर निश्चितच यातून काहिसा दिलासा मिळेल.

सन 1961 ते 1970 या दहा वर्षांत येथे सर्वाधिक 8206 मि.मी. तर सर्वात कमी 3336 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर 71 ते 80 च्या दशकात सर्वाधिक 6347 मि. मी. तर सर्वात कमी 3231 मि. मी., 81 ते 90 दशकात सर्वाधिक 6023 व कमी 3618 मि.मी. तर 91 ते 2000 सालापर्यंत सर्वाधिक 7994 व कमी 3653 मि.मी., 2001 ते 2010 मध्ये सर्वाधिक 2006 साली नवजा येथे उच्चांकी 8330 मि. मी. तर 2003 मध्ये सर्वात निच्यांकी कोयना येथे 2552 मि. मि. ची नोंद झाली . 2011 ते 2021 पर्यंत सर्वाधिक 8420 मि. मी. सर्वात कमी 2771 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सर्वांनीच सतर्कता बाळगणे सार्वत्रिक हिताचे

एकूण आकडेवारी लक्षात घेता निसर्गाचा समतोल प्रत्येकवेळी बदलल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत येथे पूर्वीच्या तुलनेत पाऊसमान कमी होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल, ग्लोबल वॉर्मिंग याबाबत सर्वांनीच सतर्कता बाळगणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT