सातारा

सातारा : पर्यटनवाढीसाठी आर्थिक तरतूद करू

Arun Patil

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सुरक्षित आणि सुखदायी पर्यटन आणि सातारकरांना रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण करुन देणार्‍या पर्यटन प्रकल्पांना निधीची कमतरता पडू नये, याकरता देशाच्या येणार्‍या पुरवणी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करावी, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड यांना केली. त्यावर मंत्रीमहोदयांनी खा. उदयनराजेंंना अपेक्षित असलेल्या पर्यटन वाढीकरता अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची ग्वाही दिली.

खा. उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे केंद्राचे अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड यांची आवर्जून भेट घेतली. त्यावेळी सातारा जिल्हयाची जडणघडण, ऐतिहासिक वारसा, जागतिक वारसास्थळे, प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांसह अन्य ठिकाणे, आध्यात्मिक केंद्रे अशा विविध ठिकाणच्या शाश्वत विकासाबाबत सुमारे दिड तास चर्चा झाली. यासंदर्भात खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कास पठार, कास धरण परिसर, पेट्री गुहा, बामणोली, वासोटा किल्ला, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी, क्षेत्र महाबळेश्वर, ठोसेघर धबधबा, चाळकेवाडी, भांबवली गावातील वजराई धबधबा, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, प्रतापगड, तीर्थक्षेत्र वाई, यवतेश्वर, पाटेश्वर, गोंदवले, चाफळ अशी आणखी बरीच ठिकाणे आहेत.

अशा प्रत्येक ठिकाणांच्या पायाभूत सुविधांसह समृध्द विकासाचे संकल्पचित्र या विषयातील अधिकारी व्यक्तींच्या माध्यमातून आमच्याकडे तयार आहे. आम्ही सुचवत असलेल्या नियोजित कामांना विशेष निधी आवश्यक आहे. याकरता अर्थसकल्पात पहिल्या वर्षाकरता किमान 1500 कोटींची तरतूद करण्यात यावी. सातारा पर्यटन विकासाचे स्वतंत्र प्राधिकरण/कार्यकारी मंडळ स्थापन करुन त्या माध्यमातून विकास कामे राबवली जावीत, असे खा. उदयनराजे यांनी सांगितले. यावर ना. भागवत कराड यांनी आपल्या योजना मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात योग्य ती तरतुद करु, असे स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT