सातारा

सातारा : नोकरीच्या आमिषाने 17 लाखांची फसवणूक

Arun Patil

पलूस ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील जखीणवाडी येथील एकाची 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी पलूस पोलिसात मनोज तुकाराम नलवडे (रा.जखीणवाडी, कराड, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. पलूस), सय्यद नूरमहंमद शेख (वय 31, रा. सांडगेवाडी), शाहीन सिकंदर मुलाणी (26, रा. पुणदी, ता. पलूस), सौरभ श्रावण पाटील (22, रा. शिंगणापूर, जि. कोल्हापूर) या चार संशयितांना पलूस पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : 4 एप्रिल 2018 ते 29 मार्च 2021 पर्यंत वरील चार संशयितांनी फिर्यादी नलवडे यांना रेल्वे विभागाचे बोगस नोकरी मिळाल्याचे पत्र देऊन त्यांना कोलकाता, दिल्ली, रांची, लखनौ, पुणे, मुंबई असे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ट्रेनिंग दिले.
सर्व काही खरे आहे असे भासवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात 17 लाख रुपयांची फसवणूक केली.

परंतु हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे नलवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 14 जून रोजी पलूस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांची शोध मोहीम सुरू केली. संशयित हे त्यांचे मूळगाव सोडून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव करीत पोलिसांना गुंगारा देत होते.

पलूस पोलिस ठाणे व सायबर पोलिस यांनी संशयितांच्या मोबाईल नंबरवरून त्यांचा ठिकाणा ट्रेस केला. त्यानंतर सापळा लावून चौघांनाही पकडले. पोलिसी खाक्या दाखवताच फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. चौघांनाही न्यायालयात हजर केले असता 20 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

SCROLL FOR NEXT