सातारा ; प्रवीण शिंगटे : शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षकांवर प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2023 पासून केली जाणार आहे.
* सातारा जिल्ह्यात 4 लाख 22 हजार विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 81 हजार 843 विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड आहेत तर अद्यापही सुमारे 40 हजार 323 विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची आधार नोंदणी करून घेण्यासाठी कालबध्द कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* त्याचप्रमाणे दर महिन्याच्या दि. 28 तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षणाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारी 2023 पासून आधारकार्ड असणार्या विद्यार्थ्यांनाच शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे.
* प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड काढून ते सलग्न करण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षकांना आता आधारकार्ड जोडणीचे अतिरिक्त काम करावे लागणार आहे.
योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डेटाबेस…
* राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वैयक्तीक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचा माहितीसाठी (डेटाबेस) तयार केला जाणार आहे. तो डेटाबेस आधारकार्डशी जोडला जाणार आहे.
* त्यानुसार शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणार्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. पात्र सर्व शाळांतील लाभार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांचे आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही.
आधार कार्डच्या कामामुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात आणखी भर
सर्वच विद्यार्थ्यांना आता आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. त्यासाठी अद्यापही चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले की नाही हे आता गुरुजींना पहावे लागणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून घेण्याचे अतिरिक्त काम करावे लागणार असल्याने त्यांच्या अशैक्षणिक कामामध्ये आणखी एक भर पडल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी आधारकार्डची अपेक्षा ठेवणे योग्य आहे. परंतु, आधार कार्ड नसल्यामुळे किंवा न जुळणारे असल्यास शालेय पोषण आहारापासून वंचित ठेवणे हा त्या विद्यार्थ्यांवरील अन्याय असणार आहे. त्यात त्यामध्ये विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्याला पोषण आहारापासून वंचित ठेवल्यासारखे होणार असल्याचा सूरही उमटत आहे.