सातारा

सातारा : ‘दो फूल एक माली..’ अन् रागिणी पेटली

मोहन कारंडे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : अमित मारायचा.. झोडायचा.. अन्याय करायचा पण त्याला सोडायचा कधीच विचार केला नाही. त्याने मात्र नव्या मैत्रिणीसोबत संसार थाटण्यासाठी घटस्फोटाची नोटीस धाडली. 'दो फूल एक माली' या वादातूनच रागिणी संतापली, पेटली अन् भलतच शिजत गेलं. प्रॉपर्टी घेण्यासाठी मोका साधून त्याने आणखी काही जणींना धोका दिल्याचेही समोर येत आहे. अमितच्या मर्डरनंतर या क्लिष्ट प्रकरणातील एकेक 'भानगड' आता बाहेर येवू लागली आहे.

सातारच्या शुक्रवार पेठेतील अमित भोसले याच्या खुनाला वाचा फुटल्यानंतर पोलिस तपासाला वेग येऊ लागला आहे. सहा जणांना बेड्या ठोकल्यानंतर प्रत्येकाचा जाबजबाब, नेमकी वस्तुस्थिती व त्याबाबतचे पुरावे पोलिस गोळा करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार अमितची गेल्या चार वर्षापासूनची झालेली नवीन मैत्रिण या वादाला कारणीभूत ठरली असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. अमित तिच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्याने रागिणीचा संताप होत होता. कारण अमित रागिणीसोबत चुकीचे
वागत असला तरी तिला त्याला सोडायचे नव्हते, असे आता ती म्हणत आहे.

अमितच्या नव्या अफेअरपूर्वीही आणखी काही अफेअर होती. यामध्ये समान धागा असा आहे की, प्रत्येकीकडे प्रॉपर्टी, सोने, पैसे भरपूर होते. जिला जिचा हक्क मिळत नव्हता तो मिळवून देण्यासाठी अमित थेट नडत होता. या माध्यमातूनच तो स्वत: हात धुवून घेत होता. पैसे, जागा, सोने मिळाले की पुन्हा 'दुसरी' अशा पध्दतीने तो आयुष्य जगत होता. रागिणीने अनेकदा अमितला समजावण्याचा प्रयत्न केला. पाहिजे तेवढे पैसे देवून मदत करते, असेही सांगितले. मात्र त्याच्या अपेक्षा वाढत गेल्याने तिच्यावरही मर्यादा आल्या. नव्या मैत्रिणीच्या झाशात तो अडकल्याने रागिणी खार खावून राहिली.

पहिला क्लू मिळाला अन् लिंक झाली ओपन

अमितच्या खुनामध्ये पोलिसांना सुरुवातीला हाती काहीच लागत नव्हते. तांत्रिक तपासाला सुरुवात झाल्यानंतर एक एक पदर उलगडण्यास सुरुवात झाली. पोनि विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश्वर दळवी, पोलिस दादा परिहार या तालुका पोलिसांनी सर्वप्रथम एका संशयिताला पुणे येथून गुरुवारी पकडल्यानंतर केसमध्ये पहिला मोठा क्लू मिळाला. संशयिताला बोलते केल्यानंतर त्याने सुपारी देणारा, सुपारी घेणारा, सुपारी वाजवायला देणारा आणि सुपारी वाजवणारा अशी चार लिंकची सिस्टीम वापरल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच पुढे इतर संशयितांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत झाली.

सातारचा ठरतोय 'बारक्या पॅटर्न'

  • सातारा शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी लहान मुलांचा वापर होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.
  • लहान मुलांच्या सहभागामुळे पडद्याआडून खेळी करणार्‍यांना अभय मिळत आहे.
  • खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने सातारचा जणू बारक्या पॅटर्न अशी ओळख होवू लागली आहे.
  • गंभीर गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचे वय 18 ऐवजी 15 पर्यंत आणावे, असेही पोलिस व नागरिकांचे मत होवू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT