सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा शहर परिसरातील अजंठा चौकात दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणार्या युवकाला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) ताब्यात घेतले असता त्याने दुचाकी व बॅटर्या चोर्या केल्याची कबुली दिली. चोरीमध्ये दोघांचा समावेश असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रल्हाद शिवाजी पवार (वय 23) व शिवाजी मल्हारी बुट्टे (वय 38, दोघे रा. अजंठा चौक, सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे डीबीचे पथक दुचाकी चोरट्यांची माहिती घेत गस्त घालत होते. अजंठा चौकात एकजण दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसताच पोलिसांनी त्याला हटकले. संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला ताब्यात घेवून दुचाकीबाबत विचारणा करताच त्याने ती चोरीची असल्याचे कबुली दिली.
संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने एकूण 3 दुचाकी व ट्रकमधील 2 बॅटर्या चोरी केल्याचे सांगितले. यामध्ये त्याने त्याच्या साथीदाराचेही पोलिसांना नाव सांगितले. पोलिसांनी दुसर्या साथीदाराला पकडून एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गेल्या काही महिन्यांपासून सातारा शहरात दुचाकी चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसात शाहूपुरी व शहर पोलिसांनी 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. अटक केलेले संशयित सराईत असून यातील एकजण तर तडीपार केलेला आहे. पोलिस संशयितांना पकडतात व कोर्टात त्यांना हजर करतात. पोलिस कोठडी संपल्यानंतर मात्र संशयितांना कोर्ट पुन्हा लगेचच बॉन्डवर सोडते. यामुळे गुन्हा केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात सुटका होत असल्याने चोरट्यांचे फावत आहे.