सातारा

सातारा : दीपोत्सवाच्या झगमगाटाने उजळला आसमंत

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वर्षातील सर्वात मोठा सण असणार्‍या दिवाळीचा सर्वत्र माहोल सुरू आहे. दीपोत्सवाला सोमवारपासून उधाण आले असून, दिवाळीमुळे सारे वातावरण चैतन्यमय झाले आहे. घरोघरी फराळांचा दरवळ असून, बालचमूचांही आनंद द्विगुणीत झाला आहे. बाजारपेठ तर कधीपासूनच हाऊसफुल्ल असून, आकाशकंदील व पणत्यांचा थाट दिसून येत आहे. 'दिवाळी' या एकाच शब्दात जीवनाचे सार, मांगल्य सामावलं असून, पणत्याचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्याचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई अशा मनमोहक वातावरणाच्या झगमगाटाने अवघा आसमंत दीपोत्सवात तल्लीन झाला आहे.

महागाई असली तरीही…

दिवाळी हा वर्षातील सवार्ंत मोठा व आनंदाचा सण आहे. आबालवृद्ध हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. महागाई असली तरी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकाचा कल दिसून येत आहे.

उद्या खरेदीला आणखी जोर

बाजारामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीबरोबरच कपडे व दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी धांदल उडाली आहे. काही नागरिक बाजार व बजेटचा अंदाज घेऊन खरेदी करत आहेत. उद्या दिवाळी पाडव्याला तर आणखी खरेदीला जोर येणार आहे.

फटाके फोडताय… जरा जपून..!

दिवाळीतील पहिले अभ्यंगस्नान व लक्ष्मीपूजन सोमवारी फटाके फोडून धूमधडाक्यात साजरे झाले. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली गेली. आता आणखी काही दिवस बच्चे कंपनी फटाक्यांची आतषबाजी करणार आहे. मात्र, फटाके फोडताना काळजी घ्यावी लागणार आहे.अतिउत्साहाच्या भरात फटाके फोडताना अपघात होऊन आनंदावर विरजण पडते आणि दुष्परिणामही कायमस्वरुपी असू शकतात. त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. यावेळी लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही असणे आवश्यक आहे.

पहिल्या अभ्यंगस्नानानंतर पहाटे आतषबाजी सुरू झाली. लहान-मोठे असे सर्वचजण फटाक्यांच्या या आतषबाजीचा आनंद घेत असतात. यावेळी राहत्या घरापासून दूर मोकळ्या मैदानावर फटाके लावणे सुरक्षित ठरते. लहान मुले फटाके लावत असताना वडीलधार्‍यांनी तेथे असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने तर दक्षता घेतली तर अशा दुर्घटना टाळता येतील.

दिवाळीत फटाके फोडताना चिमुकल्यांच्या उत्साहाला जणू भरती आलेली असते. यावेळी अनेक क्लृप्त्या ही बालमंडळी शोधत असतात. मग लोखंडी किंवा प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या, बॉक्सेस आदी फटाक्यावर ठेवून फटाका उडवणे, हातात फटाका फोडणे असे प्रकार मुले करू शकतात. सर्व फटाके संपल्यानंतर न फुटलेले फटाके शोधतही बहुतेक चिमुकले हिंडत असतात. न फुटलेला फटाकाच हातात फुटून इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वडिलधार्‍यांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT