सातारा

सातारा : दागिने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 15 लाखांचा ऐवज हस्तगत

दिनेश चोरगे

लोणंद; पुढारी वृतसेवा :  एसटी स्टॅण्डमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली असून पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील 16 गुन्हे उघडकीस आणून 15 लाख 40 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

हसाबाई नामदेव कांबळे (वय 45, रा. उदगीर गांधीनगर ता. उदगीर, जि. लातूर), श्रीमती हारणाबाई बाबू सकट (वय 65, रा. बाहेगावरोड, आनंदनगर, देगणूर ता. देगणूर, जि. नांदेड), नरसिंग कोंडीबा बन (वय 38, रा. उदगीर गांधीनगर ता. उदगीर, जि. लातूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. लोणंद पोलिस ठाणे हद्दीत बसस्टॅण्ड लोणंद येथे महिला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवून वृध्द महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.

लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकार्‍यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा मागमूस लागताच पोलिसांनी संशयितांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले. यामध्ये दोन महिला संशयित असून त्या उदगीर, लातूर येथून इनोव्हा कारमधून येवून त्यांनी लोणंद तसेच वाई, औरंगाबाद (ग्रा) कवठे महाकाळ (सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतुर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 16 चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेे आहे. लोंणद पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने व इनोव्हा कार असा एकूण 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संशयितांनी लोणंद पोलिस ठाणे हद्दीसह पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील 16 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधीकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, पोलिस हवालदार संतोष नाळे, अतुल कुमार, पोलिस नाईक श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, फैय्याज शेख, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, केतन लाळगे, प्रमोद क्षीरसागर, विजय शिंदे, विठ्ठल काळे, प्रिया दुरगुडे, अश्विनी माने, तसेच उदगीर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार पुलेवाड यांनी केली .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT