सातारा

सातारा : दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी भरारी पथके

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  उच्च माध्यमिक बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांना विविध सूचना देण्यात आल्या असून परीक्षा केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार असून, 51 परीक्षा केंद्रांवर 36 हजार 87 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा दि.2 ते 25 मार्च या दरम्यान होणार असून, परीक्षा 116 केंद्रांवर 38 हजार 541 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. दहावी व बारावी परीक्षेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) अशा पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या भरारी पथकामार्फत व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. परीक्षेच्या निर्धारित 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडून गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचवणार्‍या रनर्सना जीपीएसद्वारे ट्रॅक केले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवली जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली. विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी दीपक कर्पे व शांतीनाथ मल्लाडे या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना व पालकांना मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी समुपदेशकांशी संपर्क साधावा. विद्यार्थी व पालकांनी दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी आपला बैठक क्रमांक कोणत्या केंद्रावर आला आहे
याची माहिती संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून घ्यावी.

परीक्षा केंद्रांवर 144 कलम जाहीर

परीक्षा केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने 144 कलम जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा केद्रांना बंदोबस्त व परीक्षक केंद्रांना शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त देण्याबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर महसूल विभागामार्फत बैठ्या पथकाची नियुक्ती करून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सूचना दिल्या आहेत.

SCROLL FOR NEXT