सातारा

सातारा : दरेत मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार; गार्‍हाणे मांडण्यासाठी गर्दी

अनुराधा कोरवी

बामणोली : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा खासगी जिल्हा दौरा पूर्ण झाला. यामध्ये त्यांनी शेतीत थोडा वेळ दिल्यानंतर अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. बुधवारी त्यांच्या दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी त्यांच्या दरे गावी जनता दरबार भरला. यावेळी नागरिकांची गार्‍हाणी ऐकून मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना करत नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावले. यावेळी पंचक्रोशीसह जिल्ह्यातील विविध भागातील नागरिक उपस्थित होते. त्यांची कामे पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी लागलीच मुंबईला प्रयाण केले.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळगाव असणार्‍या दरे तर्फ तांब येथे सोमवारी (दि. 31 ऑक्टोबर) रोजी खासगी दौर्‍यावर आले होते.
त्यांनी पहिल्या दिवशी श्रद्धास्थान असलेल्या उतरेश्वराचे दर्शन घेत भागाची पाहणी केली. यानंतर मंगळवारी दिवसभर ते शेतात रमले. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. तसेच हळदीचीही कोळपणी केली. यावेळी राज्याला शेतात राबणारा मुख्यमंत्री दिसून आला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी नागरिकांना भेटण्यासाठी मुबलक वेळ दिला. सकाळी 10 ते 12.30 या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार भरवला. मुख्यमंत्री स्वत: समस्या ऐकणार असल्याने कोयना भागातील 105 गावांसह जिल्हा व परजिह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र देशमुख, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे यांच्या जनता दरबारसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. मात्र, पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळावे, यासाठी नियोजन केले होते. त्यामुळे गोंधळ उडाला नाही.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाच्या समस्या ऐकल्या. यावेळी जिल्हा पातळीवरील समस्यांचा निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. अनेकांनी समस्या मांडण्यासोबतच लेखी निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. मुख्यमंत्री गावी आल्यानंतरच त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांच्या गावी जणू काही यात्राच भरल्याचा आभास जाणवला.

जनता दरबार भरवणारा पहिलाच मुख्यमंत्री अन् समाधानी नागरीक

दरम्यान, गावी आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौर्‍यात भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे काम मार्गी लावले. जे लोक निवेदन घेऊन आले होते. त्या ठिकाणी तात्काळ त्या पत्रावर सही करून कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जनता दरबार भरवणारा पहिलाच मुख्यमंत्री पाहिल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान होते.

SCROLL FOR NEXT