उंडाळे : वैभव पाटील
माजी मंत्री स्व. विलासराव पाटील यांची जन्मभूमी व राजकीय कारकिर्द ज्या मतदारसंघात सुरू झाली त्या उंडाळे जि. प. मतदारसंघात आजही उंडाळकर यांचे उत्तराधिकारी अॅड. उदयसिंह पाटील यांचेच विकास सेवा सोसायटी मतदारसंघात वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे उंडाळे जि. प.हा काँग्रेसचा पर्यायाने उंडाळकरांचा बालेकिल्ला आजही अभेद्य आहे. याउलट भाजपला या मतदारसंघात फारसे यश मिळाले नाही, तर राष्ट्रवादीचे सक्षम नेतृत्व नसल्याने त्यांच्या हाती भोपळाच राहिला.
कराड दक्षिण मतदार संघाचे गेली 35 वर्षे नेतृत्व केलेल्या माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचे वर्चस्व होते. ते हयात असतानाही अनेकदा या मतदारसंघातील विविध विकास सेवा सोसायट्यावर उंडाळकर विरोधी गटाचे वर्चस्व राहिले. पण उंडाळकर यांच्या पश्चात अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाने या मतदारसंघात एकूण 12 सोसायटी पैकी 11 सोसायटीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. विभागातील येळगाव ही एकमेव विकास सेवा सोसायटी भाजप प्रदेशचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या ताब्यात राहिली. या सोसायटीत त्यांना राष्ट्रवादीचे युवा नेते अॅड. आनंदराव पाटील यांचे सहकार्य लाभले. या शिवाय ज्या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना झाला त्या ठिकाणी उंडाळकर विरोधी सर्वच गटाने भाजपाला सहकार्य केल्याचे चित्र आहे. असे असले तरी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या हाती काहीच लागले नाही. राष्ट्रवादी ही भाजपच्या मागे ओढत गेल्याचे चित्र दिसून आले.
राष्ट्रवादीचे नेते म्हणवून घेणारे अॅड. राजाभाऊ पाटील यांनी विकास सेवा सोसायटीत आपला दबदबा राहील, अशी भीमगर्जना केली होती परंतु त्यांच्या हाती भोपळाच आला. केवळ नेतृत्व हवे म्हणून राजकारणात यशस्वी होता येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. परंतु हे न करता केवळ नेतृत्वाला हपापलेल्या प्रमाणे त्यांनी या विभागात विकास सेवा सोसायटी निवडणुकीत लक्ष घातले. उमेदवार मिळत नसतानाही शिक्षण संस्थेतील शिक्षकांना व अन्य लोकांना जबरदस्तीने उभे करून नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. परंतु लादलेल्या उमेदवारीमुळे त्यांना कोठेही यश मिळाले नाही. याउलट अतुल भोसले यांच्या मदतीने काही ठिकाणी यश मिळवण्याचा प्रयत्न केला व राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधली.
विभागात भाजपचे प्राबल्य नसले तरी डॉ. अतुल भोसले यांचा गट चांगला असल्याने त्यांना काही अंशी विकास सेवा सोसायटी 1 /2 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला सागर जाधव वगळता जागा मिळाली नाही हे या विभागातील वैशिष्ट्ये आहे. मतदारसंघातील उंडाळे, टाळगाव, घोगाव, म्हासोली, सवादे, येवती, गोटेवाडी, येणपे, साळशिरंबे, जिंती, मनू, विकास सेवा सोसायटी सध्या उंडाळकर गटाचे वर्चस्व असून येणपे व जिंती गावात निवडणुका होणे बाकी आहे. उंडाळकर यांचे वर्चस्व असलेल्या काही ग्रामपंचायतीमध्ये भाजप संचालक
म्हणून विजयी झाले आहेत पण ती संख्या एक दोनच आहे मनू सोसायटीची स्थिती संमिश्र आहे.
त्यामुळे विभागात अॅड.उदयसिंह पाटील — उंडाळकर, आ. पृथ्वीराज चव्हाण या नेतृत्वाला पहिली पसंती मिळाली आहे. आणि मिळत आहे त्यामुळे भविष्यकाळात येणार्या निवडणुकात उंडाळे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला तर नवल वाटायला नको.
स्व. विलासराव पाटील-वाठारकर असताना विभागात राष्ट्रवादीला या विभागात चांगले यश लाभत होते. परंतु त्यानंतर विभागात राष्ट्रवादीला योग्य नेतृत्व मिळाल्याने या विभागात राष्ट्रवादीची वाढ न होता घटच झाली व भाजपचे प्राबल्य हळूहळू वाढू लागले आहे. हे सर्व असतानाही उदयसिंह पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरीने या विभागातील आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे.