सातारा

सातारा : तलवारीसह तडीपार गुंडाला अटक

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा :  तडीपार गुंडाने सातार्‍यातील सदरबझारमध्ये धारदार तलवार नाचवून दहशत केल्याप्रकरणी परिसर हादरला होता. याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाच्या पथकाने मलिंगा उर्फ विपुल तानाजी नलवडे (वय 20, रा.करंजे, सातारा) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्‍त केली.

दि. 25 रोजी मित्राच्या घरी वादावादी झाल्यानंतर मित्रासोबत जावून गुंड विपुल नलवडे याने राडा केला होता. मित्राच्या कुटुंबियांना दमबाजी करत परिसरात आरडाओरडा केला. हा सर्व प्रकार घडत असतानाच संशयिताकडे तलवार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारीत संशयित आरोपीमध्ये 'मलिंगा' असे नाव असल्याने पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याची माहिती घेतली. संशयित विपुल नलवडे तडीपार असतानाही सातार्‍यात आल्याने व त्याने धुडगूस घातल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते. डीबी पथकाने तत्काळ तपासाला सुरुवात करत संशयिताची माहिती घेतली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदरबझारमध्ये राडा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून तलवार कुठे ठेवली आहे? हे विचारताच संशयिताने त्याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्यातील तलवार जप्‍त केली.

पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, गणेश भोंग यांनी कारवाईत सहभाग घेतला.

SCROLL FOR NEXT