सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी शहरात पावसासह सोसाट्याचा वारा सुटला होता. दुपारी 1 च्या सुमारास सर्किट हाऊसनजीक झाड उन्मळून पडल्याने सदरबझारकडे जाणारी वाहतून तब्बल 3 तास ठप्प पडली होती. या घटनेत दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुरू आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळणे, झाडे कोसळणे, घरांची पडझड होणे, रस्ते खचने अशा घटना घडत आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषद ते सदरबझार या रस्त्यावर सर्किट हाऊसनजीक दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाड उन्मळून पडले. यावेळी दोन महिला दुचाकीवरून जात होत्या. या घटनेत झाडाची फांदी त्यांच्या अंगावर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
झाडामुळे वीज खांब वाकल्याने तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती वाहतूक पोलिस यंत्रणेला मिळताच त्यांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. नगरपालिका, महावितरण यांनी हे झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.