खटाव : पुढारी वृत्तसेवा
माण आणि खटाव या दोन्ही दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून या योजनेच्या उर्वरित कामांसाठी 247 कोटी 34 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील 6 कोटी 48 लाखांचा निधी वर्गही करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी दिली. केंद्राकडून निधी मिळणे सुरु झाल्याने या योजनेची कामे वेगाने मार्गी लागून माण आणि खटावच्या जनतेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याविषयी माहिती देताना आ. जयकुमार म्हणाले, 3.17 टीएमसी पाणी उचलून माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यातील 67 गावांमधील 27 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेसाठी गेल्या 13 वर्षात आम्ही खूप संघर्ष केला. मी पहिल्यांदा आमदार झाल्यापासून या योजनेला निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नांना यश येवून राज्याच्या अर्थसंकल्पांमध्ये अनेक वेळा तरतूद होवून पहिला टप्पा अंशत: सुरु होण्याइतपत कामे मार्गी लागली. या योजनेची प्रस्तावित आणि वाढीव कामे होण्यासाठी केंद्राकडून निधी मिळवणे गरजेचे होते. त्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती.
या योजनेवर आत्तापर्यंत 632 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. बॅरेज आणि रायझिंग मेन्न्सची कामे झाली आहेत. योजनेचा पहिला टप्पा सुरु करण्यासाठी चाचणी घेण्यात आली आहे. उरलेले 19600 हेक्टर क्षेत्र आगामी तीन वर्षात ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून सध्या अपेक्षित निधी मिळत नाही असे सांगून प्रकल्पाचे संपूर्ण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतून निधी मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवाय मध्ये त्वरित करावा, अशी लेखी मागणी मी आणि खा. निंबाळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष भेटून केली होती.
मोदींनी त्वरित तशा सुचना केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला दिल्या होत्या. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 247 कोटी 34 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे तसेच त्यातील 6 कोटी 48 लाखांचा निधी वर्गही करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. आ. जयकुमार गोरे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेला आता केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्याने उर्वरित कामे वेगाने मार्गी लागतील. या योजनेचे पाणी खटाव तालुक्यात आले आहे. ते पुढे माण तालुक्यातील आंधळी धरणात आणून वाढीव योजनेद्वारे उत्तर भागातील 32 गावांना देणे लवकरच शक्य होणार आहे.