सातारा

सातारा : जिहे-कठापूरसाठी 697 कोटी देणार : पंतप्रधान

Shambhuraj Pachindre

खटाव : पुढारी वृत्तसेवा

माण व खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्‍या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करुन योजनेच्या उर्वरित कामासाठी 697 कोटींचा निधी मिळण्यासाठी तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. मोदींनीही या योजनेचा समावेश पीएमकेएसवायमध्ये करुन लागणारे 697 कोटी त्वरित देण्याचे आदेश केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला दिले. फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठीही निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांनी यापूर्वीही जलशक्ती मंत्रालयासह विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन जिहे-कठापूर योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती. या योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत होण्यासाठी या दोघांनी प्रयत्न केले होते. दोन दिवसापूर्वी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे व आ. सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. 3.17 टीएमसी पाणी उचलून माण व खटाव या दुष्काळी तालुक्यातील 67 गावांमधील 27 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या जिहे -कठापूर योजनेसाठी आत्तापर्यंत 632 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

बॅरेज आणि रायझिंग मेन्न्सची कामे झाली आहेत. 2021 मध्ये योजनेचा पहिला टप्पा सुरु करण्यासाठी चाचणी घेण्यात आली आहे. उरलेले 19600 हेक्टर क्षेत्र आगामी 3 वर्षांत ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना योजनेच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून सध्या अपेक्षित निधी मिळत नाही असे सांगून प्रकल्पाचे संपूर्ण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतून लागणारा सर्व निधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवाय मध्ये त्वरित करावा, अशी मागणी खा. निंबाळकर व आ. गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मोदींनी याबाबत तशा सुचना केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला दिल्या.

जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि फलटणला जोडणार्‍या रेल्वे लाईनचा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला आहे. या कामासाठी जमीन अधिग्रहणही करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजप सरकारने या कामासाठी 1400 कोटींच्या निधीला स्विकृती दिली होती. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने प्रत्येकी 50 टक्के निधी खर्च करुन हे काम पूर्णत्वाला जाणार होते. या योजनेचा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे गेला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून या कामासाठी सहकार्य करण्याविषयी सांगितले होते.

मात्र खा. शरद पवार यांच्या दबावामुळे सध्याच्या महाराष्ट्र सरकारने काहीच कार्यवाही केली नसल्याचे खा. निंबाळकर यांनी मोदींच्या निदर्शनास आणून दिले. फलटण-पंढरपूर रेल्वे लाईनच्या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. केंद्रसरकार शेतकर्‍यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शेती हा एक यशस्वी उद्योग म्हणून कसा भरभराटीला येईल यावर सरकार निरंतर काम करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी खा. निंबाळकर, आ. गोरे व आ. खोत यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

मोदींनी काढली गुरु लक्ष्मणराव इनामदारांची आठवण

जिहे-कठापूर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरु खटावचे लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा चॅरिटेबल ट्रस्टही खटावमध्ये सुरु आहे. खा. निंबाळकर आणि आ. गोरे यांच्या बरोबर जिहे-कठापूरच्या निधीबाबत चर्चा सुरु असताना मोदींनी गुरु लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण काढली. जिहे-कठापूर योजनेचे जलपूजन करण्यासाठी मतदारसंघात येण्याचे निमंत्रणही मोदींना देण्यात आले. त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकारही केला आहे.

माझ्या मतदारसंघातील जिहे-कठापूर योजनेचे उर्वरित काम मार्गी लागून इथला पाणीप्रश्न सुटावा म्हणून पंतप्रधान मोदींजींबरोबर चर्चा करता आली याचा मला आनंद आणि अभिमान आहे. ही योजना मार्गी लावण्याची ग्वाही देवून त्यांनी योजनेच्या जलपूजनाला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. या योजनेचे प्रेझेंटेशन पंतप्रधान कार्यालयात त्यांच्यामुळेच करता आले होते. थेट पंतप्रधानांबरोबर विकासकामांची चर्चा करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे.
– आ. जयकुमार गोरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT