सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या 319 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदासाठी रेकॉर्ड ब्रेक 8 हजार 419 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये सरपंचपदासाठी 1 हजार 430 तर सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 6 हजार 989 अर्जांचा समावेश आहे. सदस्यसंख्येच्या जवळपास तिप्पट उमेदवारी अर्ज दाखल झाले. नामनिर्देशपत्रांची छाननी दि. 4 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून असून, वैध-अवैध अर्जांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनी पुन्हा 'इलेक्शन फिव्हर' सुरू झाला आहे. जिल्ह्यात 319 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामंचायतींमध्ये आचारसिंहता लागू झाल्याने विकासकामांची उद्घाटने करण्यास मनाई आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेत गावपातळीवरील पॅनेलप्रमुख काळजी घेत आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी अंतिम मुदत असल्याने इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली होती. काही तालुक्यांमध्ये निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी असून उमेदवारी अर्जही जादा आले आहेत. गर्दी असल्यामुळे वेळेत येवूनही इच्छुकांना रात्री उशिरपर्यंत अर्ज भरण्यासाठी वाट पहावी लागली. अशा परिस्थितीत काही तालुक्यांमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती. सरपंचपदाच्या 319 जागांसाठी 1 हजार 441 अर्ज दाखल झाले. तर सदस्यपदाच्या 2 हजार 661 जागांसाठी 6 हजार 957 अर्ज दाखल झाले. सर्वाधिक अर्ज कोरेगाव, कराड आणि पाटण तालुक्यातून दाखल झाले असून निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतींची जादा संख्याही याच तालुक्यांतील आहे.
सातारा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 39 जागेसाठी 140 तर सदस्यपदाच्या 325 जागेसाठी 850 अर्ज असे एकूण 990 अर्ज दाखल झाले. कोरेगाव तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 51 जागेसाठी 207 तर सदस्यपदाच्या 417 जागेसाठी 1 हजार 12 अर्ज असे एकूण 1 हजार 219 अर्ज भरण्यात आले. वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 7 जागेसाठी 35 तर सदस्यपदाच्या 69 जागेसाठी 197 अर्ज असे एकूण 232 अर्ज दाखल झाले. खंडाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 2 जागेसाठी 20 तर सदस्यपदाच्या 26 जागेसाठी 134 अर्ज असे एकूण 154 अर्ज सादर करण्यात आले. महाबळेश्वर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 6 जागेसाठी 13 तर सदस्यपदाच्या 42 जागेसाठी 60 अर्ज असे एकूण 73 अर्ज दाखल झाले.
जावली तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 15 जागेसाठी 46 तर सदस्यपदाच्या 107 जागेसाठी 190 अर्ज असे एकूण 236 अर्ज सादर झाले. फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 24 जागेसाठी 169 तर सदस्यपदाच्या 238 जागेसाठी 736 अर्ज असे एकूण 905 अर्ज भरण्यात आले. खटाव तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 15 जागेसाठी 66 तर सदस्यपदाच्या 127 जागेसाठी 318 अर्ज असे एकूण 384 अर्ज दाखल झाले. माण तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 30 जागेसाठी 184 तर सदस्यपदाच्या 256 जागेसाठी 774 अर्ज असे एकूण 959 अर्ज भरण्यात आले. कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 44 जागेसाठी 189 अर्ज तर सदस्यपदाच्या 386 जागेसाठी 1 हजार 19 अर्ज असे एकूण 1 हजार 208 अर्ज सादर झाले.
पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या 86 जागेसाठी 361 तर सदस्यपदाच्या 668 जागेसाठी 1 हजार 699 अर्ज असे एकूण 2 हजार 60 अर्ज दाखल झाले. सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या 319 ग्रामपंचायतींच्या 119 सरपंचपदासाठी 1 हजार 430 तर 2 हजार 661 सदस्यपदासाठी 6 हजार 989 हजार असे एकूण 8 हजार 419 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, अखेरच्या दिवशी जादा अर्ज दाखल होतात. त्यामुळे यंत्रणेवर ताण येवू शकतो किंवा प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी अर्ज भरता यावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 व 2 रोजी ऑफलाईन पध्दतीने (पारंपरिक पध्दतीने) अर्ज भरुन घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार पाच तालुक्यांतून सरपंचपदपदासाठी एकूण 202 तर सदस्यपदासाठी 1164 अर्ज पारंपरिक पध्दतीने भरण्यात आले.
खंडाळा तालुक्यातून सरपंच पदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 27 अर्ज, महाबळेश्वर तालुक्यात सरपंचपदासाठी 9 तर सदस्यपदासाठी 39 अर्ज, जावली तालुक्यात सरपंचपदासाठी 14 तर सदस्यपदासाठी 53 उमेदवारी अर्ज, पाटण तालुक्यात सरपंचपदासाठी 116 तर सदस्यपदासाठी 723 अर्ज, माणमध्ये सरपंचपदासाठी 59 तर सदस्यपदासाठी 322 अर्ज ऑफलाईन पध्दतीने भरण्यात आले.
या उमेदवारी अर्जांची छाननी प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूल उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या सुचनेनुसार संबंधित तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी दि. 5 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना माघार घेता येणार आहे.
जिल्ह्यात निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे अर्ज भरले जात असताना काही ठिकाणी सरपंच व सदस्यपदासाठी अर्जच दाखल झाला नाही. अर्ज दाखल न झाल्याने कोरेगाव तालुक्यात सरपंचपदाच्या 51 पैकी 2, तर सदस्यपदाच्या 417 पैकी 5 जागा रिक्त राहिल्या. जावली तालुक्यात सदस्यपदाच्या107 पैकी 8 जागा रिक्त राहिल्या. रिक्त राहिलेल्या जागांवर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.