सातारा

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात जोरदार पाऊस

Arun Patil

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सुरुवातीपासूनच अडखळणार्‍या मान्सूनने सोमवारी दुपारपासून बरसायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरदर्‍यांत जोरदार पाऊस सुरू झाला असून शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. पश्चिमेकडे ही अवस्था असताना पूर्वेकडील कोरेगाव, माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यांत मात्र पावसाची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, पश्चिमकडे पावसाचा जोर असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली या तालुक्यांत तुलनेने पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : महाबळेश्वर 85.8 मि.मी., सातारा 10.2 मि.मी., जावली 35.0 मि.मी., वाई 24.3 मि.मी., पाटण 31.2 मि.मी., कराड 8.0 मि.मी., कोरेगाव 10.5 मि.मी., खटाव 0.9 मि.मी., माण 6.1 मि.मी., फलटण 11.9 मि.मी., खंडाळा 13.1 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मिळाली.

पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी अद्यापही मुसळधार पावसाने धमाका केलेला नाही. सध्या जोरदार वारे व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पश्चिम भागातील डोंगररांगा दाट धुक्यांमध्ये हरवल्या आहेत. तापोळा खोर्‍यातील त्रिवेणी संगम, सोळशी, कोयना, कांदाटी येथील नद्या भरून वाहत आहेत.जावली तालुक्यातील मरडमुरे घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

तसेच घाट रस्त्यावर छोटे-मोठे

दगड वाहून आले आहेत.कास परिसरातही पावसाचा जोर वाढल्याने कास धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कास पठारावरील कूमूदिनी तलाव ओसडूंन वाहू लागला आहे. ठोसेघर, वजराई, केळवली, सांडवली, एकीव यासह छोटे मोठे धबधबे ओसडूंन वाहू लागले आहेत. तसेच डोंगर रांगातही छोटे मोठे धबधबे वाहताना दिसत आहेत.

पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पश्चिम भागात शेतकर्‍यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. पुर्वेस पावसाने ओढ दिली असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सातारा शहर व परिसरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहेत.

प्रतापगडजवळ दरड कोसळली

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी किल्ले प्रतापगडकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ती तातडीने हटवली व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. गेल्या चार दिवसांपासून जोरदार वार्‍यासह तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. किल्ले प्रतापगडकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मंगळवारी दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीतही झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यातील दरड हटवली व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी दिली.

महाबळेश्वरमध्ये नऊ तासांत 87.4 मिमी पाऊस

पावसाचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या महाबळेश्वरमध्ये संततधार सुरू आहे. येथे दि. 1 जून ते 5 जुलै सकाळपर्यंत 707.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस 27.83 इंच आहे. मंगळवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या 9 तासांत 87.4 मि.मी. म्हणजेच 3.44 इंच पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT