सातारा

सातारा : जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला; वाढत्या थंडीने जनजीवनाला भरलं कापरं

दिनेश चोरगे

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी सातार्‍याचे 15.5 अंशावर, तर महाबळेश्वरचे तापमान 7 अंशांवर आले होते. वाढत्या थंडीने जनजीवनाला कापरे भरू लागले असून रात्रपाळीत उबीसाठी जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

भूमध्य समुद्रात उठलेल्या शीतलहरी तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे. त्याचा परिणाम राज्यभर जाणवू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली असून तापमानाचा पारा घसरल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी थंडीची तीव्रता आणखी वाढली. सातारा शहराचे तापमान15.5 अंश, तर महाबळेश्वरचे तापमान 7 इतके नोंदवण्यात आले. पहाटेच्या वेळी दाट धुके पडले होते. तसेच दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. त्यामुळे दिवसाही थंडीने हुडहुडी भरत होती. उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडणे मुश्कील झाले होते. रात्रपाळीत काम करणार्‍या नागरिकांना वाढत्या थंडीने कापरे भरत होते. थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात उबीसाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सूर्यास्त होताच थंडी वाढत असल्याने सातारा शहर व परिसरातील रस्ते लवकरच निर्मनुष्य होत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते, सुरक्षा रक्षक, औद्योगिक वसाहतीमध्ये शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी यांची कडाक्याच्या थंडीतही जगण्यासाठी धडपड सुरू आहे. दरम्यान, रब्बीच्या पिकांसाठी थंडी पोषक असली, तरी नुकतीच लागवड केलेला ऊस, कांदा पिकाला वाढत्या थंडीचा फटका बसणार आहे. पहाटेच्यावेळी मोठ्या प्रमाणात दव पडत आहे. गुलाबी थंडीने पर्यटनाला बहर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT