सातारा; महेंद्र खंदारे : सातारा जिल्हा हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. यामुळे जिल्ह्यात मोठया संख्येने पशुधनही आहे. मात्र, आता या पशुधनावर आता लम्पी या त्वचारोग संसर्गजन्य आजाराने संकट ओढावले आहे. याचा परिणाम जिल्ह्याच्या दूध संकलनावर झाला आहे. दैनंदिन सुमारे 15 हजार लिटर दूधाचे संकलन घटले असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जनावरांचे जीव जात असताना दुसरीकडे उत्पन्नही घटल्याने शेतकर्यांना भुर्दंड बसत आहे. यामध्ये दुष्काळी असणार्या माण, खटाव व फलटण तालुक्याला जास्त फटका बसला आहे.
कोरोनामुळे जसे माणसाचे आयुष्य धोक्यात आले. तसेच लम्पी या त्वचाजन्य रोगामुळे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आले आहे. देशात सुरुवातीला राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये असणारे लम्पी नावाचे संकट महाराष्ट्रात आले अन् पशुधनावर मोठी आपत्ती कोसळली. राज्यात सर्वत्र याचा प्रादुर्भाव पसरला असून सातारा जिल्हाही यातून सुटलेला नाही. सध्याच्या घडीला जिल्ह्यात हजारांहून अधिक बाधित जनावरे आणि शेकडो जनावरांचे झालेले मृत्यू यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
लम्पीचे नाव काढले की शेतकर्यांच्या छातीत धडधडू लागले आहे. जिल्ह्यात सातारा, जावली, कराड, पाटण, फलटण, माण, खटाव, वाई, खंडाळा, कोरेगाव या 10 तालुक्यांमध्ये लंपीने आपला विळखा घट्ट केला आहे. लम्पीची सुरुवात कराडमधून झाल्यानंतर या रोगाने हळूहळू पाय पसरण्यास सुरूवात झाली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या आजाराने हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आहे. त्यातूनच राज्य सरकार आणि पशुसंवर्धन विभागाने धडा घेत उपाययोजना केल्या.
परंतु, तरीही सध्याच्या घडीला 10 तालुक्यातील 136 गावांमध्ये प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे 2 हजार 799 गायी व 348 बैल अशा 3 हजार 147 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. तर 213 पशुधन मृत्युमुखी पडले आहे. बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित गावांच्या 5 कि.मी. क्षेत्र हे अधिगृहीत करून तेथील जनावरांचे विलगीकरण केले जात आहे. तसेच बाधित जनावरे आणि अधिगृहीत क्षेत्रातील जनावरांचे दूध काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
सध्या हिवाळा सुरू झाला असूना जिल्ह्यात या कालावधीत सुमारे 17 लाख लिटर दूधाचे संकलन होत असते. मात्र, लंपीचा काही फटका या दूध संकलनावर झाला आहे. सर्वात जास्त दुध हे फलटण, माण व खटाव या तालुक्यातून येते. मात्र, याच तालुक्यांमध्ये लंपीने डोके वर काढल्याने दैनंदिन दूध संकलन हे 15 हजार लिटरने घटले आहे. यामुळे शेतकर्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे लम्पीमुळे लाडक्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू असताना शेतीस पूरक असणार्या दूग्ध व्यवसायाला या आजाराने अवकळा आणली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. जनावरांचे जीव जात असताना दूधातून येणारे उत्पन्नही आता आटले आहे.