सातारा; पुढारी वृत्तसेवा : बाल कामगार कायदा होवून 37 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, याची सुरूवातीच्या काळात प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने बालकामगारांची संख्या जास्त होती. मात्र, अलीकडच्या काळात गांभीर्याने सरकारने उपाययोजना केल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने गत काही वर्षात 100 हून अधिक धाडी टाकल्या. यामध्ये केवळ 3 बालकामगार आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची बाल कामगार मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.
बालकामगार कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पूर्वी या कायद्याची अपेक्षित जनजागृती नसल्याने मुले शिक्षण सोडून कामाला जात होते. अलीकडच्या काळात मात्र सहयक कामगार आयुक्त कार्यालयाकडून बालकामगार कायद्याची जनजागृती करून कडक कारवाई केली. या कार्यालयाकडून टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये केवळ 3 बालकामगार आढळले. त्यांचेही प्रबोधन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात बालकामगारांची संख्या कमी झाली आहे. मुलांसाठी शिक्षण मोफत असून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यामुळे मुलांना शिकवण्याकडे कल वाढू लागला आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडूनही बालकामगार मुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
-रेवणनाथ भिसले, सहाय्यक कामगार आयुक्त