सातारा; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती घराण्याची महती जगभर प्रसिध्द आहे. इतिहासकालीन राजघराणे व त्याकाळातील सुवर्ण युगाविषयीची माहितीचे पुरावे आजही पहावयास मिळतात. त्यातील अनेक पुरावे हे देश-विदेशातील अनेक संग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहेत. यापैकी काही पुरावे हे सातार्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातही पहावयास मिळतात. या पुराव्यांची भावी पिढीलाही माहिती व्हावी याकरता या संग्रहालयातील साहित्याच्या संर्वधनाचे काम सुरू असून या वस्तूंचे आयुष्यमान वाढणार आहे.
100 ते 400 वर्षांहून अधिक कालावधी पूर्वीची शस्त्रे, वस्त्रे व पेंटींग संग्रहालयात उपलब्ध आहेत. या वस्तूंमध्ये तख्त (सातार्याची गादी), या संबंधीच्या सर्व वस्तू 17 मिनिचर पेंटींग, सोन्याची जर असलेल्या रेशमी साड्या, पैठणी साड्या, कापडी चिलखत आदींसह इतर अंगवस्त्रांचे दालन येथे आहेत. हवेतील आर्द्रता, वातावरणातील बदल यामुळे संग्रहालयातील आकर्षण असलेल्या येथील वस्तू जीर्ण होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. यामुळे या वस्तूंच्या संवर्धनाचे काम पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे. याकरता पुरातत्व व वस्तू संग्रहालय विभाग, मुंबईचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताराचे अभिरक्षक प्रविण शिंदे यांच्या अधिक्षतेखाली किर्ती जोशी, आनंद शेळके व मधुरा शेळके या तज्ञांकडून येथील साहित्याच्या डागडुजी (संवर्धनाचे) काम सुरू आहे.
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथील वस्तूंची डागडुजी करण्यात येत आहे. यामुळे येथील वस्तूंचे आयुष्य वाढणार असुन पुढील 50 वर्षापर्यंत जशाच्या तशा या वस्तू टिकून राहणार आहेत.
-प्रविण शिंदे, अभिरक्षक, शिवाजी संग्रहालय